मुंबई : महिला वर्गाला खुश करण्याकरिता अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर करण्यात आली असली तरी त्यातील अटी जाचक असल्याने किती महिलांना त्याचा लाभ होईल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. यावरून विरोधकांनी टीका करताच महायुती सरकारने यातील अनेक अटी मंगळवारी शिथिल केल्या. यानुसार २१ ते ६५ वयोगटातील महिलांचा यात समावेश करण्यात आला असून, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास पिवळे वा केशरी शिधापत्रिका धारकांना लाभ घेता येईल तसेेच लाभार्थींना ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटीत बदल करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली होती. यानुसार सायंकाळी सरकारने सभागृहात निवेदन करीत अटी शिथिल केल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. यासाठीची वयोमर्यादा ६० वरुन आता ६५ वर्षे करण्यात येत असून पाच एकरच्या जमिनीची मर्यादाही रद्द करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे जाहीर केले. त्याचप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलैपासूनचा आर्थिक लाभ दिला जाईल. या योजनेतील अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली असून त्याऐवजी एक वर्षापू्वीची शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र चालेल. परराज्यातील महिलांनी राज्यात अधिवास असलेल्या पुरुषांसोबत लग्न केले असेल तर अशा बाबतीत सदर महिलेच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. त्याचप्रमाणे २.५ लाख मर्यादेत उत्नन्नाचा दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका आहे, त्यांना उत्पनाच्या दाखल्यापासून सूट देण्य़ात आली आहे. तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजेनेची अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याचा दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांची जी आकडेवारी (बीपीएल) उपलब्ध आहे त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे. यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही.

दलालांचा सुळसुळाट चव्हाण

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्यात ठिकठिकाणी सरकारी कार्यालयांमध्ये महिला वर्गाची गर्दी वाढली आहे. तसेच या योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढल्याकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष वेधले.

Story img Loader