मुंबई : मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक केल्यावर विविध राज्यांना भेटी देण्याच्या उपक्रमअंतर्गत दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहरात दाखल होताच ‘जय मराठा, जय बांगला’चा नारा देत शिवसेनेशी राजकीय सहकार्याचे मंगळवारी संकेत दिले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ममतादीदींची भेट घेतली.
पश्चिम बंगालमध्ये उद्योजकांना निमंत्रित करण्याकरिता तसेच राजकीय भेटीसाठी ममता बॅनर्जी या मुंबईत दाखल झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची त्यांची योजना होती, परंतु ठाकरे हे रुग्णालयात दाखल असल्याने आदित्य ठाकरे यांनी बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत हेसुद्धा होते. ममता बॅनर्जी या उद्या दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.
मुंबईत दाखल होताच बॅनर्जी यांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केल्याचे सांगत जय मराठा, जय बांगला अशी घोषणा त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात केली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत बंगाली मतदारांची शिवसेनेला मदत करावी, असाच संदेश ममतादीदींना दिल्याचे मानले जात आहे. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मरिन ड्राइव्हवरील २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात शहीद झालेले तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकालाही भेट दिली.
ममतांशी चर्चा
ममता बॅनर्जी यांचे शिवसेनेशी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी समन्वयाचे व राजकीय मैत्रीचे नाते आहे. दोन वर्षांपूर्वी त्या मुंबईत आल्या तेव्हाही आम्ही ममतादीदींना भेटलो होतो. आजही त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून प्रकृतीची विचारपूस करायची होती, पण रुग्णालयातील जैव सुरक्षा कवचमुळे (बायोबबल) दोघांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मी व संजय राऊत त्यांना भेटायला आलो. अनेक विषयांवर चर्चा झाली आणि राजकीय मैत्रीचे नाते वाढवणारी ही भेट होती, असे सूचक विधान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना केले.