बसचे ठिकाण, येण्याचा कालावधी प्रवाशांना त्वरित समजणार
वेळेच्या बाबतीत बेभरवशाची बनत चाललेली ‘बेस्ट’ उपक्रमाची बससेवा टाळून रिक्षा आणि टॅक्सीकडे वळलेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘बेस्ट’ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचे ठरवले आहे. बेस्टच्या बसगाडय़ांत जीपीएस यंत्रणा बसवून मार्गाचे ट्रॅकिंग केले जाणार आहे. त्यामुळे कोणती बस कुठे आहे किंवा किती वेळात येणार आहे. अशी सर्व माहिती अॅपवर उपलब्ध होईल. ही सेवा तांत्रिक बाबी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्याची वातानुकूलित बससेवेत अंमलबजावणी केली जाईल, असे सांगण्यात आले.
सध्या बेस्टच्या बसगाडय़ांत जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र जीपीएस यंत्रणा बसवण्यात आलेल्या बसगाडीच्या केवळ पहिल्या टप्प्याची माहिती सध्या उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यावर काम सुरू आहे. साधारण जूनपर्यंत बसगाडीच्या ‘ट्रॅकिंग’चे काम पूर्ण होईल. त्यानंतर बसगाडय़ांची माहिती अॅपवर उपलब्ध होईल. मात्र त्याबाबतच्या तांत्रिक बाबी पूर्ण करून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल, यात काही कालावधी जाईल, असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाहतूक कोंडीतही वेळेनुसार, सोयीनुसार हवे तिथून आरामदायी प्रवास घडवणाऱ्या अॅपआधारित टॅक्सी प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे बेस्ट बसगाडय़ांना याचा फटका बसत आहे. याच धर्तीवर बेस्ट प्रशासनाकडून अॅपआधारित टॅक्सींना टक्कर देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यात बेस्टच्या अॅपमध्ये बसगाडीतील राखीव आसने, बसगाडीच्या वेळांसह, मार्ग आणि तिकिटांची माहिती यात उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.
बसगाडय़ांची माहिती स्क्रीनवर
ज्या प्रवाशांकडे अॅप उपलब्ध नाही अशा प्रवाशांना बस गाडी किती वेळात येईल याची माहिती स्क्रिनवर उपलब्ध होईल. बस टर्मिनस आणि महत्त्वाच्या थांब्यावर या स्क्रिन बसवण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ’बेस्ट’च्या प्रवाशांना उत्तम सेवा पुरवणे हा या मागचा उद्देश आहे. अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना बस गाडी कुठे आहे व ती किती वेळात थांब्यावर येईल हे कळण्यास मदत होईल. तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर याचा निर्णय घेण्यात येईल.
– जगदीश पाटील, महाव्यवस्थापक, बेस्ट