लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : बेस्टच्या बसगाड्यांची हद्द ही फक्त मुंबईच्या सीमेपर्यंतच असली तरी बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या मिनी गाड्या नाशिक-कसारा मार्गावर चालवण्यात येत असल्याचे वृत्त लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बेस्ट प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. कंत्राट रद्द झालेल्या बसगाड्यांवरील बेस्ट उपक्रमाचे बोधचिन्हे त्वरित हटवण्याबाबत बेस्ट प्रशासनाने कंत्राटदाराला कळवले आहे.

बेस्टच्या बसगाड्यांची सेवा ही केवळ मुंबईपुरती आहे. त्यातही पश्चिम उपनगराचे टोक म्हणून बेस्टच्या गाड्या भाईंदरपर्यंत धावतात. तर पूर्व उपनगरात बेस्टच्या गाड्या वाशी, मुलुंडपर्यंत धावतात. मात्र काही महिन्यांपूर्वी दिवसांपासून बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या गाड्या नाशिक कसारा मार्गावरही दिसत असल्याचे आढळून आले होते. बेस्टच्या भाडेतत्त्वावरील कंत्राटदार कंपनीचे कंत्राट रद्द झाल्यानंतर या गाड्या विविध ठिकाणी अनधिकृतपणे चालवल्या जात आहेत. कोणामार्फत या गाड्या चालवल्या जात आहेत त्याची कोणतीही माहिती बेस्ट प्रशासनाकडे नाही. कंत्राटदार कंपनीकडे वाहतूकीचा परवाना असल्यामुळे या गाड्या चालवल्या जात असल्याबाबतचे वृत्त लोकसत्तामध्ये १३ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

कंत्राटदार कंपनीचे कंत्राट ऑक्टोबर २०२४ मध्ये रद्द झाले होते. कंत्राट रद्द केल्यानंतर कंत्राटदाराने आपल्या ७ मीटरच्या मिनी बसगाड्या बेस्ट आगारातून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सुरूवात केली. अशीच एक बस नाशिक मार्गावर दिसली असावी असे प्रशासनाचे म्हणणे आहे. ही बस बेस्टच्या बोधचिन्हासह दिसली होती. ही बाब गंभीर असल्यामुळे कंत्राट रद्द झालेल्या बसगाड्यांवरील बेस्ट उपक्रमाचे बोधचिन्ह त्वरित हटवण्याबाबत कंत्राटदाराला कळविण्यात आल्याची माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार बेस्टच्या रद्द झालेल्या कंत्राटातील गाड्यांवरील बोधचिन्ह हटवण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, बेस्टला भाडेतत्वावरील बसगाड्या पुरवण्यासाठी ज्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती. त्यात सुरुवातीच्या काळातील एक कंत्राटदार कंपनी तोट्यात गेली. त्यामुळे ही कंपनी आणि बेस्टमधील करार रद्द झाला. कंपनीच्या ३०० बसगाड्या बेस्टच्या सेवेत होत्या. या कंपनीच्या गाड्या बेस्ट उपक्रमाने जप्त केला होत्या. जप्त केलेल्या गाड्या बेस्टच्या आणिक आगारात गेले वर्ष दीडवर्षे उभ्या होत्या. या कंपनीला बसगाड्या घेण्यासाठी ज्या बँकांनी किंवा आर्थिक संस्थांनी मदत केली होती त्या संस्थांनी कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. जसजसे निकाल लागत आहेत तसतशा या गाड्या सोडवून नेल्या जात आहेत. मात्र या गाड्यांचे पुढे काय होते याचा कोणताही लेखाजोखा बेस्ट प्रशासनाकडे नाही. त्यामुळे या गाड्या बेस्टचे बोधचिन्ह न काढताच अनेक ठिकाणी वापरल्या जात आहेत. मुंबईत तर या गाड्यांच्या आडून लोकांची लूट सुरू असून लोकांची दिशाभूलही केली जात असल्याचे आढळून आले आहे. मात्र आता बेस्ट प्रशासनाने कंत्राटदाराला निर्देश दिले आहेत.