‘ई-गव्हर्नन्स’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ‘बेस्ट’ने हायटेक कारभाराच्या नावाखाली वाट्टेल तसा पैसा खर्च केला आहे. फक्त मुंबईपुरत्या मर्यादित कार्यक्षेत्रासाठी ‘बेस्ट’ने ११३ सव्र्हर्स उभारले असून ९५ कलर लेझर प्रिंटर्सटचा ताफाही ‘बेस्ट’च्या कार्यालयांमध्ये आहे. त्यातच पुरवठादार कंपनीने बेस्टला दुय्यम प्रतीचे संगणक दिल्याचा आरोप समितीच्या बैठकीत सदस्य केदार होंबाळकर यांनी केला. महाव्यवस्थापक गुप्ता यांनीही ई- गव्हर्नन्स आणताना आयटी योजना अस्तित्वात नसल्याची कबुली दिली.
बेस्टच्या कुर्ला व चिंचोली बंदर या आगारांमध्ये लॅन पद्धतीच्या पुरवठय़ासह संगणक प्रणाली बसवण्याचा विषय समितीसमोर चर्चेला आल्यानंतर होंबाळकर यांनी आपले मत मांडले. थायमस सोल्युशन्स या कंपनीतर्फे ४२ ते ४४ हजार रुपये एका संगणकासाठी आकारण्यात आले. सध्या बाजारातील उत्तमोत्तम ब्रँड्सच्या संगणकांसाठी ३५ ते ४० हजार रुपये खूप होतात. मात्र थायमसने दिलेले संगणक कोणत्याही ब्रँडचे नसून ‘असेंबल्ड’ आहेत, असे होंबाळकर म्हणाले.
‘बेस्ट’च्या हायटेक प्रणालीवर ताशेरे ओढताना होंबाळकर यांनी विस्तृत आकडेवारीच सादर केली. बेस्टने मुंबईभर एकूण ११३ सव्र्हर उभे केले आहेत. प्रत्येक आगारात एक असे २५ आगारांत २५ सव्र्हर आहेत. त्याशिवाय २८४६ मशीन्स, १७३२ प्रिंटर्सही बेस्टने घेतले आहेत. एकीकडे ‘पेपर फ्री’ प्रशासनाकडे वाटचाल करणाऱ्या बेस्टमध्ये ९५ कलर लेझर प्रिंटर्स आहेत. त्याशिवाय ‘बेस्ट’ वापरत असलेले नॉव्हेल नेटवेअर हे सॉफ्टवेअर अद्ययावत नाही. बेस्टमध्ये सध्या क्लीपर प्रणालीवर सर्व काम चालत असून ही प्रणाली दशकभरापूर्वीच कालबाह्य झाली आहे, असे ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चौकशी होणार
होंबाळकर यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी समिती सदस्यांपैकी दोन, अधिकाऱ्यांपैकी तीन आणि एक बाहेरील तंत्रज्ञ यांची समिती स्थापन करण्यात येईल. तसेच लवकरच योग्य तंत्रज्ञांकडून माहिती तंत्रज्ञानाबाबत लेखा परिक्षण करून घेतले जाणार आह़े
 – ओमप्रकाश गुप्ता, महाव्यवस्थापक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best administration established 113 new server to become hightek but used secondary quality computer