तांत्रिक बिघाड, देखभाल दुरुस्ती आणि मुंबईकरांच्या अल्प प्रतिसादामुळे बेस्टच्या ताफ्यातील वातानुकूलित बसगाडीचे साध्या बसगाडीत रूपांतर करण्याचा पर्याय बेस्ट प्रशासनाकडून चाचपडून पाहिला जात आहे. याबाबत मोटार वाहन कायद्याच्या नियमानुसार हा बदल करता येणे शक्य आहे का? याबाबत बेस्ट प्रशासाने ताडदेव प्रादेशिक परिवहन विभागाकडे विचारणा केली आहे. हा पर्याय मान्य झाल्यास येणाऱ्या काळात काही मार्गावर मुंबईकरांच्या गारेगार प्रवासाला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.
सध्या बेस्टच्या ताफ्यातील २८४ वातानुकूलित बसगाडय़ांपैकी अवघ्या १०९ बसगाडय़ा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. यात विविध कारणांमुळे सुमारे साठ टक्के वातानुकूलित बसगाडय़ा बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांत प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली आहे. सुरुवातीला रोज ७२ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. सध्या हीच संख्या १० हजारांवर आल्याने प्रशासनाला कोटय़वधीचा तोटा सहन करावा लागत आहे.
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन बेस्टने २००७ साली वातानुकूलित बससेवा सुरू केली. त्यासाठी किंगलाँगच्या बसगाडय़ा विकत घेण्यात आल्या. मात्र या गाडय़ांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने त्या वाहतुकीलाही अडथळा ठरत आहेत. त्यामुळे प्रवाशांनीही या बसगाडय़ांकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. जवळच्या अंतरासाठी ही बसगाडी सोडावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या बसगाडीचे रूपांतर साध्या गाडीत केले जावे अशी मागणीही केली जात आहे. दरम्यान, प्रवाशांची कमी होणारी संख्या आणि तांत्रिक बिघाड यावर अभ्यास सुरू आहे. तसेच काही वातानुकूलित बस गाडय़ांचे रूपांतर साध्या बसगाडीत करता येते का? याबाबातची शक्यता तपासून पाहिली जात आहे.
मात्र याबाबत अद्यप कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी दिले. तर दुसरीकडे बेस्ट प्रशासनाचे अधिकारी वातानुकूलित बसगाडय़ांचे रूपांतर साध्या बसगाडीत होऊ शकते का? याबाबत चर्चेसाठी आले होते. याबाबत आम्ही त्यांना नियमाप्रमाणे या गोष्टी शक्य असल्याचे कळवले आहे, असे ताडदेव प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा