एकीकडे राज्य परिवहन महामंडळाने आपल्या नैमित्तिक करार दरांमध्ये कपात करत प्रवाशांना आकर्षित करण्याचे पाऊल उचलले आहे तर बेस्ट उपक्रमाने मात्र आपल्या आरक्षित बसच्या भाडय़ात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापालिका शाळा, मराठी चित्रपट-मालिका निर्माते यांना मात्र या भाडय़ात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे, असे बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी
सांगितले.
एसटी महामंडळाने काहीच दिवसांपूर्वी आपल्या नैमित्तिक कराराच्या दरांमध्ये कपात केली होती. एसटी महामंडळाच्या गाडय़ा जास्तीत जास्त नैमित्तिक करारावर घेतल्या जाव्यात, हा यामागचा उद्देश असल्याचे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी स्पष्ट केले होते.
या पाश्र्वभूमीवर बेस्टने मंगळवारी बेस्टने आपल्या आरक्षित बससाठी दरवाढ केल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. या नव्या भाडय़ानुसार पोलीस किंवा अन्य पथकांना एका पूर्ण दिवसासाठी नऊ हजारांऐवजी १२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. हेच भाडे अध्र्या दिवसासाठी ४५०० ऐवजी ६००० एवढे आकारले जाईल.
डबल डेकर बससाठी पूर्ण दिवसासाठी १८ हजार आणि अध्र्या दिवसासाठी ९ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.