तोटय़ास कारणीभूत ठरणारी वातानुकूलित बस सेवा पांढरा हत्ती बनू लागल्यामुळे बेस्ट उपक्रमाने आता काही बसमार्ग बंद करण्याचा, तर काहींचे विलिनीकरण आणि काहींचा प्रवास मध्येच संपविण्याचा मार्ग अवलंबिला आहे. त्यामुळे बेस्टने बोलबाला करीत मुंबईकरांना घडविलेला ‘शीतल’ प्रवास हळूहळू खुंटू लागला आहे.
मुंबईकरांना शीतल प्रवास घडविण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मोठा गाजावाजा करीत आपल्या ताफ्यात वातानुकूलित बस सहभागी केल्या. मात्र वारंवार मध्येच बंद पडणाऱ्या बसगाडय़ांना कंटाळून प्रवाशांनी त्यांच्याकडे हळूहळू पाठ फिरविली. परिणामी वातानुकूलित सेवांमुळे बेस्टच्या तोटय़ात भर पडू लागली आणि बेस्टने या सेवेबाबत आखडता हात घ्यायला सुरुवात केली. कमी अंतरासाठी ही सेवा सुरू ठेवण्याची घोषणा बेस्टने केली असली तरी हळूहळू वातानुकूलित बस भविष्यात आगारातच उभ्या राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
बेस्टने अलिकडेच वातानुकूलित बसगाडय़ांचा आढावा घेतला असून होणारा तोटा टाळण्यासाठी या सेवेत १ नोव्हेंबरपासून काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे प्रबोधनकार ठाकरे नगर बसस्थानक (चारकोप) आणि मुलुंड आगार दरम्यान घोडबंदर मार्गावरुन धावणारी एएस-४५८, तसेच वांद्रे आगार आणि वाशी बसस्थानक दरम्यान धावणारी एएस-५०५ बंद करण्यात येणार आहे. एएस-४५८ च्या प्रवाशांसाठी एएस-७०० च्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. तसेच एएस-५०५ च्या प्रवाशांना नियोजित स्थळी जाण्यासाठी एएस-५०३ व एएस-५९२ चा पर्याय उपलब्ध आहे.
हिरानंदानी, लोढा संकुल ते बँकबे आगार दरम्यान धावणाऱ्या ए-१३ जलत, ए-१३ जलद (जादा) या बसगाडय़ा आता माटुंगा येथील महेश्वरी उद्यानापर्यंत, तसेच ओशिवरा आगार, हिरानंदानी संकुल, गोराई आगार आणि कुलाबा आगार दरम्यान धावणाऱ्या ए-७४ जलद, ए-७५ जलद आणि ए-७६ जलद या बसगाडय़ा आता वरळीच्या नेहरू तारांगणपर्यंतच सोडण्यात येणार आहेत. एल अॅण्ड टी इन्फोटेक, महापे आणि वसंतराव नाईक चौक, ताडदेव दरम्यान धावणारी एएस-५९२ ही बस आता माटुंगा येथील माहेश्वरी उद्यानापर्यंतच सोडण्यात येणार आहे. ए-७० जलद ही बस रद्द करुन तिचे मंत्रालय ते मिरारोड रेल्वे स्थानका-दरम्यान धावणाऱ्या एएस-२ मध्ये विलिनीकरण करण्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महेश्वरी उद्यान व बॅकबे आगारादरम्यान एएस-६, एएस-७ या दोन वातानुकूलित बस नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत.
‘बेस्ट’चा वातानुकूलित प्रवास खुंटला!
तोटय़ास कारणीभूत ठरणारी वातानुकूलित बस सेवा पांढरा हत्ती बनू लागल्यामुळे बेस्ट उपक्रमाने आता काही बसमार्ग बंद करण्याचा
First published on: 21-10-2013 at 03:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best airconditionar journy remain dream