बेस्टच्या पहिल्या दोन टप्प्यांच्या भाडय़ात एक रुपयाने वाढ करण्याच्या प्रस्तावाचा समावेश असलेल्या २०१३-१४ या आर्थिक वर्षांच्या बेस्टच्या शिलकी अर्थसंकल्पास बेस्ट समितीने गुरुवारी मंजुरी दिली. त्यामुळे आधीच महागाईत होरपळणाऱ्या मुंबईकरांना एप्रिलमध्ये पुन्हा एकदा बेस्ट बस भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे. बस भाडेवाढीचा समावेश असलेल्या अर्थसंकल्पास विरोध करीत काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला.
बेस्ट प्रशासनाने आपला ६३१७ कोटी ६८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प अलीकडेच बेस्ट समितीपुढे सादर केला होता. आर्थिक स्थिती नाजूक बनलेल्या बेस्ट प्रशासनाने गेल्या काही वर्षांच्या इतिहासात प्रथमच १ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला असून भविष्यात बेस्ट तोटय़ातून बाहेर पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. बेस्टचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी प्रशासनाने गेल्या जुलैमध्ये बेस्ट बसची भाडेवाढ केली होती. आता २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात पुन्हा भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार बेस्टच्या पहिल्या दोन टप्प्यांच्या भाडय़ात एक रुपयाने वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यासाठी पाच रुपयांऐवजी सहा रुपये आणि दुसऱ्या टप्प्यासाठी सात रुपयांऐवजी आठ रुपये मोजावे लागणार आहेत.
अलीकडेच डिझेलच्या दरात प्रतिलिटर पाच रुपयांनी, तर सीएनजीच्या दरात ९५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टच्या तिजोरीवर अनुक्रमे २५ कोटी व साडेपाच कोटी रुपयांचा भार पडणार आहे. येत्या काळात डिझेल आणि सीएनजीच्या दरात आणखी किती वाढ होईल हे सांगणे अवघड आहे. मात्र त्यामुळे बेस्टवर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडणार आहे. बेस्टची सुधारत असलेली आर्थिक घडी पुन्हा विस्कटू नये यासाठी २०१३-१४ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेल्या बस दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. ही दरवाढ १ एप्रिल २०१३ रोजी लागू करण्यात येईल, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली. मुंबईत ७०० खासगी बसगाडय़ा धावत असून त्याचा बेस्टला फटका बसला आहे, असेही ते म्हणाले.
प्रस्तावित भाडेवाढीचा समावेश असलेल्या अर्थसंकल्पाला शिवसेना-भाजप युतीने संख्याबळाच्या जोरावर मंजुरी दिली. मात्र सदस्यांनी सुचविलेल्या उपाययोजना आणि सूचनांची प्रशासन आणि सत्ताधारी दखल घेत नाहीत, असा आरोप करीत काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. तसेच भाडेवाढीचा समावेश असलेल्या अर्थसंकल्पाला मनसे आणि राष्ट्रवादीनेही विरोध केला.
दरम्यान, बेस्टच्या बसमधून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे ६० टक्के प्रवासी प्रवास करीत असून त्यामुळे बेस्टच्या तिजोरीत अतिरिक्त ५० ते ६० कोटी रुपये पडणार आहेत.
आता हा अर्थसंकल्प मुंबई महापालिका सभागृहात सादर करण्यात येणार आहे. त्याला पालिका सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर १ एप्रिल २०१३ पासून भाडेवाढ लागू होणार आहे.   

Story img Loader