मुंबई : कुर्ला येथे सोमवारी झालेल्या बस अपघाताची चौकशी करण्यासाठी आणि तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
हेही वाचा – मुंबई : मार्चपासून मेट्रोची धाव वरळीपर्यंतच
कुर्ला बसस्थानक (पश्चिम) – अंधेरी बस स्थानक (पूर्व) दरम्यान बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-३३२ नियमितपणे धावते. नेहमीप्रमाणे बसमार्ग क्रमांक ए-३३२ सोमवारी रात्री ९.३० च्या कुर्ला परिसरातून जात होती. त्याच वेळी भरधाव वेगात आलेल्या बसने अनेकांना धडक दिली. या अपघातात ४९ नागरिक गंभीर जखमी झाले, तर सात जणांचा मृत्यू झाला. जखमींवर मुंबईमधील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून बेस्टतर्फे दोन लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच जखमींवरील औषधोपचाराचा खर्च मुंंबई महानगरपालिका, बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी सांगितले.