Best Bus Accident: कुर्ला येथे बेस्टच्या एका बसने भरधाव वेगात अनेक वाहनांना धडक देत काही पादचाऱ्यांना उडवले होते. या दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाला असून ४९ लोक जखमी झाले. या अपघातामुळे मुंबई हादरल्यानंतर आता पुन्हा एकदा बेस्ट बसचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. सीएसटीएम परिसरात ए २६ क्रमाकांच्या बसने एका व्यक्तीला चिरडले. ज्यात सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात सदर अपघात घडला असून या अपघाताचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान कुर्ला येथे सोमवारी झालेल्या बस अपघाताची चौकशी करण्यासाठी आणि तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!

अपघातानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी एक्सवर वाहतूक वळविल्याची माहिती दिली. “बेस्ट बस अपघातामुळे वालचंद हिराचंद मार्ग जंक्शनवर (आझाद मैदान) वाहतूक संथ गतीने सुरू आहे”, अशी माहिती एक्सवर देण्यात आली.

दरम्यान सोमवारी (९ डिसेंबर) रात्री कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. बेस्ट बसने अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले. यापैकी सात जणांचा मृत्यू झाला. कुर्ला येथील भाभा रुग्णालयामध्ये चार, शीव रुग्णालय, कोहिनूर रुग्णालय, हबीब रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे कुर्ला आणि आसपासच्या परिसरात शोकाकळा पसरली आहे.

या घटनेनंतर आता ज्या बसने भरधाव वेगात धडक दिली, त्या बसमधील आतला सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. अपघात होत असताना बसमधील प्रवाशी जीव मुठीत धरून उभे असताना दिसत आहेत. बस थांबल्यानंतर प्रवाशांनी बसमधून पळ काढला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best bus accident again in mumbai cstm area one person died kvg