Best Bus Accident : मुंबईतल्या कुर्ला पश्चिम भागात ९ डिसेंबरच्या रात्री बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. या अपघातात ( Best Bus Accident ) सहा जण ठार झाले तर ४० हून जास्त लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणात चालक संजय मोरेला अटक करण्यात आली. लोकांनी बस चालकाला पकडलं आणि मारहाण करायला सुरुवात केली होती. मात्र नंतर पोलिसांनी त्याला लोकांच्या तावडीतून सोडवलं आणि त्याला अटक केली. दरम्यान या प्रकरणात माझे पती निर्दोष आहेत असं संजय मोरेंच्या पत्नीने म्हटलं आहे.
संजय मोरे यांच्या मुलाने काय म्हटलं आहे?
माझे वडील नशा वगैरे काहीही करत नाहीत. त्याबाबत सगळ्या खोट्या बातम्या चालवण्यात येत आहे. माझे वडील संजय मोरे यांना कुठलंही व्यसन नाही. त्यांचं लायसन्स १९८९ चं आहे. सोशल मीडियावर हे पण चाललं आहे की १ डिसेंबर पासून गाडी चालवत आहेत पण लॉकडाऊनच्या नंतर म्हणजे मागच्या तीन वर्षांपासून माझे वडील बेस्टमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. जो अपघात ( Best Bus Accident ) झाला तो घडवण्याचा किंवा कुणाला इजा पोहचवण्याचा त्यांचा काहीही हेतू नव्हता. बसमध्ये तांत्रिक बिघाडामुळेच अपघात झाला हे माझं ठाम मत आहे. इलेक्ट्रिक बस ते १० ते १२ दिवसांपासून चालवत आहेत. पण त्याआधी ते टेम्पो ट्रॅव्हलर चालवत होते. तसंच माझ्या वडिलांनी पूर्ण प्रशिक्षण घेऊन नंतर ती बस त्यांना हाती देण्यात आली होती. असं संजय मोरेंच्या मुलाने सांगितलं
संजय मोरेंच्या पत्नीने काय दावा केला आहे?
संजय मोरेंच्या पत्नी काय म्हणाल्या, “मी आणि पती संजय मोरे हे खूप मेहनत करतो. माझे पती संजय मोरे हे रोज १ वाजता तिथून निघतात. माझे पती दारु पित नाहीत. कुणालाही त्रास देणार नाहीत. कधी मान वर करुनही कुणाशी बोलले नाही. २३ वर्षांपासून आमचा संसार सुरु आहे मात्र आजवर संजय मोरेंनी कधीही अपघात केलेला नाही. माझा नवरा निर्दोष आहे तो सुटून येईल. जे घडलं ते चुकून झालं आहे. माझ्या नवऱ्याचा काहीच दोष नाही. गाडीचा ब्रेक फेल झाला असावा असं मला वाटतं. माझी आणि माझ्या कुटुंबाची मागणी हीच आहे माझे पती सुखरुप घरी आले पाहिजेत. बाकी आमची काहीच मागणी नाही. जो अपघात ( Best Bus Accident ) घडला त्यात सगळा दोष मला गाडीचाच वाटतो आहे.” असं संजय मोरेंच्या पत्नीने सांगितलं. संजय मोरेंची पत्नी आणि मुलगा यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी संजय मोरेंची काहीही चूक नाही जे घडलं ते बस सदोष असल्याने घडलं असा दावा केला आहे.