मुंबई : दोन आठवड्यांपूर्वी कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे याने जामिनाच्या मागणीसाठी मंगळवारी सत्र न्यायालयात धाव घेतली. आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा मोरे याने जामिनाची मागणी करताना केला आहे.

आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे आणि विद्युत बसमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही. किंबहुना, या अपघाताला जबाबदार असलेल्या प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी आपला बळी दिला जात असल्याचा दावा मोरे याने जामीन अर्जात केला आहे. या प्रकरणात कोणत्याही बस कंत्राटदाराला अटक करण्यात आलेली नाही किंवा आरोपी करण्यात आलेले नाही. आपल्याला कार्यालयात बसून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि दिंडोशी बस आगारात विद्युत बस चालविण्यास सांगितले. त्यानंतर, आपल्याला कुर्ला येथे बस चालविण्यास परवानगी देण्यात आली, असा दावाही मोरे याने केला. तसेच, या दुर्घटनेसाठी आपल्या एकट्याला जबाबदार धरता येणार नसल्याचा पुनरुच्चारही मोरे याने केला. मोरे याने वकील समाधान सुळे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार यांच्यासमोर मोरे याच्या अर्जावर मंगळवारी प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी, मोरे याच्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश देऊन न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी २ जानावेरी रोजी ठेवली.

हेही वाचा – गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टीच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा

हेही वाचा – ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना अखेरचा निरोप

प्रकरण काय ?

कुर्ला पश्चिमेतील एस.जी. बर्वे मार्गावरील अंजुमन ए इस्लाम शाळेसमोर ९ डिसेंबर रोजी रात्री इलेक्ट्रिक बेस्ट बस पादचारी आणि वाहनांना चिरडून एका कमानीवर आदळली. कुर्ला- अंधेरी दरम्यान धावणाऱ्या बस मार्ग क्रमांक ३३२ मुळे झालेल्या या अपघातामुळे वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडले होते. वाहनाने अचानक वेग घेतला आणि वाटेत येणाऱ्यांना सुमारे २०० मीटरपर्यंत फरफटत नेले. या दुर्घटनेत आठजणांचा मृत्यू झाला आणि ४२ जण जखमी झाले. याशिवाय, २० वाहनांचे नुकसानाही झाले. या दुर्घटनेप्रकरणी मोरे याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

Story img Loader