मुंबई : कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघाताला १५ दिवस उलटून गेले तरी त्याबाबतचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही. या अपघाताप्रकरणी कोणावरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. तसेच भाडेतत्त्वावरील संबंधित कंत्राटदारावरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु अहवाल सादर होण्यापूर्वीच बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कुर्ला येथे बेस्ट बसचा ९ डिसेंबर रोजी रात्री भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण १० जणांना प्राण गमवावे लागले, तर ४० हून अधिक जण जखमी झाले. या अपघाताच्या चौकशीसाठी मुख्य व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची घोषणा बेस्ट प्रशासनाने केली होती. या अपघातानंतर महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. डिग्गीकर हे घटनास्थळी गेले नाहीत, अशीही टीका झाली होती. गेल्या १५ दिवसांत बेस्टच्या दुर्दशेच्या अनेक गोष्टी उजेडात आल्या. चालक मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवत असल्याच्या ध्वनिचित्रफितीही समाजमाध्यमांवर फिरल्या. त्यामुळे बेस्टची प्रतिमा खराब झाली. त्यातच राज्य सरकारने मंगळवारी अनिल डिग्गीकर यांची बदली केली.

हेही वाचा – नाताळच्या सुट्टीनिमित्त राणीच्या बागेत पर्यटकांची वर्दळ, महानगरपालिकेच्या तिजोरीत ३ लाखांचा महसूल जमा

हेही वाचा – भाजपचा ‘व्होट जिहाद’चा आरोप निराधार : सप

डॉ. हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती

बेस्टच्या अपघाताप्रकरणाचा अहवाल अद्याप तयार झालेला नाही. गेल्या १५ दिवसांत बेस्ट प्रशासनाने या अहवालाबाबत टोलवाटोलवीची उत्तरे दिली. चालकांना प्रशिक्षण देणार, चालकांची श्वसनाची चाचणी करणार असे अनेक मौखिक नियम या अपघातानंतर आले. मात्र या अपघाताप्रकरणी कोणावरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. डिग्गीकर यांची बदली झाल्यानंतर बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी डॉ. हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवे महाव्यवस्थापक एकूणच बेस्टच्या कारभाराबाबत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader