मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या देवनार आगारातील डागा एसएमटी – एटीपीएल भाडेतत्त्वावरील बस चालकांचा पुकारलेले काम बंद आंदोलन गुरुवारी युनियन आणि व्यवस्थापन यांच्यातील बैठकीनंतर मागे घेण्यात आले. चालक हळूहळू कर्तव्यावर दाखल झाल्यानंतर विस्कळीत असलेली बस सेवा पूर्ववत झाली.
देवनार आगारातील एका बस चालकाची मंगळवारी तेथील अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. ही घटना समजताच इतर बस चालक एकत्र आले आणि हळूहळू सर्व बस गाड्या बंद करण्यात आल्या. या आगारातील बसचालकांची पगारवाढ, दिवाळी सानुग्रह अनुदान, बेस्टनुसार रजा आदी मागण्या अधिकाऱ्यांपुढे मांडण्यात आल्या. या कंत्राटी चालकांच्या आंदोलनामुळे देवनार आगारातील बस सेवा मंगळवार आणि बुधवारी काही प्रमाणात विस्कळीत झाली, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा…घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना : संशयित अर्शद खानविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी
डागा ग्रुप व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर चालकांनी गुरुवारी दुपारी २.१५ वाजता आंदोलन मागे घेतले. आंदोलन करणाऱ्या चालकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, तर अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ला प्रकरणी जबाबदार व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले. मात्र, काही चालक कर्तव्यावर परतले. त्यामुळे बेस्टची सेवा काहीशी विस्कळीत होती. दरम्यान, कंत्राटदाराबरोबर बैठक यशस्वी झाल्याने देवनार आगारातील काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. बस चालक कामावर येण्यास सुरुवात झाली आणि बस सेवा हळूहळू पूर्ववत होत असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.