बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सरकारला धारेवर धरण्यात आले आहे.
“मुंबईतील बेस्ट प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टर्सकडून लीजवर बसेस घेतल्या आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या बस चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा आजचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत संपावर जाणाऱ्या चालकांची संख्या वाढत आहे. आणि ह्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत आहे. बेस्ट प्रशासन झोपलं आहे का? मुळातच ह्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या बसेस रस्त्यात बंद पडणं, त्यांची देखभाल नीट नसणं ह्या तक्रारी होत्याच. ह्या सगळ्यावर बेस्ट प्रशासनाने कधीच कारवाई केल्याचं दिसलं नाही. आणि आता तर थेट ह्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या बस चालकांनी संप पुकारला आणि मुंबई वेठीला धरली गेली, अशी टीका मनसेने केली आहे. यावेळी त्यांनी काही प्रश्नही विचारले आहेत.
हेही वाचा >> बेस्टच्या २७ पैकी १८ आगारांमध्ये ‘काम बंद’ आंदोलन, प्रवाशांची ससेहोलपट
१) हा संप होणार आहे, त्यावर आधीच कारवाई करावी आणि काही तयारी करावी असं बेस्ट प्रशासनाला वाटलं नाही?
२) कॉन्ट्रॅक्टर्स बेस्ट प्रशासनाला वेठीस धरू शकतात आणि त्यातून बेस्ट प्रशासनाची नाचक्की होत आहे ह्याचे प्रशासनाला काहीच वाटत नाही का?
३) ह्या कॉन्ट्रॅक्टर्स संप रोखण्यात अपयश आलं म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून, बेस्टला झालेल्या नुकसानीची भरपाई कधी आणि कशी करून घेणार?
४) राज्य सरकार ह्यावर नक्की काय पावलं उचलत आहे?
असे सवाल मनसेने विचारले आहेत. तसंच, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांना टॅग करून मनसेने विनंतीही केली आहे. “आपणांस विनंती आहे की आता तर ट्रिपल इंजिन सरकार आहे, तुमची ट्रिपल शक्ती कधी दिसणार? मुंबईकर त्रस्त आहे”, असं मनसेने म्हटलं आहे.
बेस्ट उपक्रमातील खासगी बस पुरवठा कंत्राटदारांच्या कामगारांनी शुक्रवारीही ‘काम बंद’ आंदोलन सुरूच ठेवले आहे. या आंदोलनाला विविध आगारांमधील कंत्राटी कामगारांचा पाठींबा मिळू लागला असून आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. त्याची झळ थेट मुंबईकरांना बसू लागली आहे. आंदोलनामुळे १८ आगारांमध्ये बेस्टच्या बसगाड्या उभ्या आहेत. सकाळपासून १,३७५ बस प्रवर्तित झाल्या नाहीत. या आंदोलनात एसएमटी, मातेश्वरी, टाटा, हंसा, ओलेक्ट्रा, आणि स्विच या व्यवसाय संस्थेच्या कामगारांचा सहभागी झाले आहेत.