मालाड बस आगारात कॅनेडियन वेळापत्रक राबविण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात हातभार लावण्याऐवजी तो अयशस्वी कसा होईल यासाठीच ‘बेस्ट’ची चालक-वाहक संघटना प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते, असे सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी ‘बेस्ट’च्या चालक-वाहक संघटनेला चपराक लगावली.
मालाड आगारात कॅनेडियन वेळापत्रक प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याच्या विरोधात संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. वेळापत्रक राबविण्याचा प्रयोग केवळ मालाड आगारापुरताच मर्यादित ठेवण्याचे न्यायालयाने स्पष्ट केलेले असतानाही ‘बेस्ट’ प्रशासनाकडून त्याचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. शिवाय या वेळापत्रकानुसार मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात प्रवासाचा कालावधी वाढण्याऐवजी तो कमी झाल्याचा खोटा दावा प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. त्यावर संतापलेल्या न्यायालयाने संघटनेला धारेवर धरले. संघटनेला मालाड आगारात कॅनेडियन वेळापत्रक राबविण्याचा प्रयोग अयशस्वी कसा होईल यातच स्वारस्य असल्याचे संघटनेच्या कृतीतून दिसून येते, असे न्यायालयाने सुनावले.