‘बेस्ट’च्या बस दरवाढीचा तिढा आणखी वाढला असून मुंबई महापालिकेने मंजूर केलेल्या १५० कोटी रुपयांच्या अनुदानातील उर्वरित ११२ कोटी रुपयांची रक्कम तातडीने मिळाली नाही, तर एप्रिल २०१५ नव्हे तर १ फेब्रुवारी २०१५ पासूनच बसचे प्रवासी भाडे वाढवावे लागेल, असे नमूद करीत ‘बेस्ट’ समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी बस दरवाढीचा चेंडू महापालिकेकडे टोलवला.
महापालिकेकडून ‘बेस्ट’ला १५० कोटी रुपयांचे येणे असून यापैकी ३७ कोटी ५ लाख रुपये ‘बेस्ट’ला मिळाले आहेत. ११२ कोटी ५ लाख रुपये येणे बाकी असून ती रक्कम मिळाली नाही तर १ फेब्रुवारी २०१५ पासून ‘बेस्ट’च्या तिकीटदरात वाढ केली जाईल. तसेच पुढील आर्थिक वर्षांतही ही रक्कम मिळाली नाही तर १ एप्रिलपासून पुन्हा दरवाढ केली जाणार असल्याचे दुधवडकर यांनी बुधवारी ‘बेस्ट’ समितीत सांगितले.
पालिकेने १५० कोटी रुपयांची मदत केली तर किमान भाडे सहावरून सात रुपये केले जाईल. मात्र पालिकेकडून मदत मिळाली नाही तर सहाऐवजी आठ रुपये तिकीट दरवाढ करणे अनिवार्य ठरेल, असे ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा