बेस्ट बस आणि अपघात यांचे समीकरण गेले दोन आठवडे कायम राहिले आहे. घाटकोपर पश्चिमेच्या अमृतनगर येथे बेस्ट बस गोलाकार वळवत असताना बसच्या मागच्या भागाचा धक्का लागून एक जण खाली कोसळला़  त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला बस वाहकाने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. घाटकोपर स्थानक पश्चिम ते अमृतनगर या मार्गावरील ४१६ क्रमांकाची बस सकाळी साडेअकराच्या सुमारास अमृतनगर येथे पोहोचली. त्यानंतर पुन्हा घाटकोपर स्थानकाकडे निघण्यासाठी ही बस गोलाकार वळण घेत असता गाडीच्या मागच्या भागाचा धक्का एका पादचाऱ्याला लागला. या पादचाऱ्याचे नाव समजू शकले नसले, तरी त्याचे वय अंदाजे ३५ वर्षे असावे, असे बेस्टच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.
या पादचाऱ्याला बसचा धक्का लागल्यानंतर तो खाली पडला त्याच्या डोक्यातून रक्तपात झाल्यामुळे त्याला त्वरीत राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Story img Loader