तिकीटदरवाढीमुळे प्रवाशांच्या संख्येत घट; ११ दिवसांत उत्पन्नात ३४ लाखांची कपा

डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाने चार किलोमीटरपासून पुढील प्रवासाकरिता भाडेवाढ केल्यानंतर उत्पन्न वाढण्याऐवजी त्यात घटच झाली आहे. प्रवाशांनी पाठ फिरविल्याने बेस्टची तिकीट विक्री चांगलीच कमी झाली आहे. हा परिणाम उन्हाळी सुट्टीचा आहे की बेस्ट भाडेवाढीचा हे पुढील काही दिवसांत समजेल. मात्र १२ एप्रिलपासून लागू केलेल्या या भाडेवाढीमुळे पुढील ११ दिवसांत बेस्टचे उत्पन्न तब्बल ३४ लाखांनी खाली आले आहे.

बेस्टचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपक्रमामध्ये काही आर्थिक सुधारणा सुचविल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून बेस्टच्या तिकीट दरांत वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. बेस्ट समिती, पालिका आणि त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणानेही भाडेवाढीची परवानगी दिली. त्यानंतर १२ एप्रिलपासून भाडेवाढ लागू करण्यात आली. चार किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी भाडेवाढ लागू करतानाच मासिक आणि त्रमासिक पासांतही वाढ करण्यात आली.

या भाडेवाढीमुळे उत्पन्न वाढून तिजोरीत भर पडेल अशी आशा बेस्टला होती. मात्र उत्पन्नात फारशी भर न पडल्याने बेस्टला नुकसान भरून काढण्याकरिता अन्य मार्गाचाही अवलंब करावा लागणार आहे. यात आस्थापनावरील खर्च कमी करणे हा महत्त्वाचा उपाय आहे. बेस्ट समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या सगळ्याचे खापर तिकीट काढण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या ट्रायमॅक्स मशीनवर फोडण्यात आले होते. त्यामुळे जवळपास दोन लाखांनी प्रवासी कमी झाल्याचा आरोप सदस्यांनी बैठकीत केला होता. मात्र आकडेवारीवरून भाडेवाढीनंतर बेस्टचे प्रवासी झपाटय़ाने कमी झाल्याचे दिसून येत आहेत.

१२ एप्रिलनंतरच्या अकरा दिवसांत तिकीट विक्री आणि पासच्या विक्रीत घसरण झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी बेस्टचे उत्पन्न तब्बल ३४ लाख ८६ हजार ८८२ रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे बेस्टला तारण्याकरिता भाडेवाढीबरोबरच अन्य उपाय योजण्याची गरज व्यक्त होत आहे.

उत्पन्न तेव्हा आणि आता

  • १ एप्रिल ते ११ एप्रिल या भाडेवाढ होण्यापूर्वीच्या ११ दिवसांत बेस्टला ३१ कोटी १५ लाख ८० हजार ६३६ रुपये उत्पन्न मिळाले होते.
  • भाडेवाढीनंतर १२ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यानच्याअकरा दिवसांत ते ३० कोटी ८१ लाख ५८ हजार रुपयांवर आले.
  • बेस्टला दररोज सरासरी तीन कोटी रुपये उत्पन्न मिळत असल्याचा बेस्टचा दावा आहे. मात्र, १२ एप्रिलनंतर अवघे चार ते पाच दिवस ही सरासरी काढता आली.
  • २३ एप्रिल रोजी ३ कोटींहून अधिक उत्पन्न तिकीट आणि पास विक्रीतून मिळाले आहे. मात्र ३० एप्रिलपर्यंत उत्पन्नात आणखी घसरणच होत गेली आहे.

Story img Loader