‘बेस्ट’च्या तब्बल ५२ मार्गावरील बसगाडय़ा रद्द करण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णय शिवसेनेच्या विरोधामुळे तात्पुरता स्थगित करून बऱ्याच मार्गावरील बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली असली तरी काही मार्गावर ‘फक्त गर्दीच्या वेळी’च ही बससेवा सुरू करण्यात आलेली आहे. मात्र, ‘फक्त गर्दीच्या वेळी’ म्हणजे नेमकी कोणत्या वेळी या मार्गावर बस धावणार आहेत, हे बेस्टने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे अशा बेभरवशाच्या बससेवेवर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

‘मुलुंड पश्चिम ते महापे- एल अ‍ॅण्ड टी’ या मार्गावर धावणाऱ्या बस क्र. ५१४ च्या बाबतीतही ‘फक्त गर्दीच्या वेळी’ अशी सूचना ‘महापे- एल अ‍ॅण्ड टी’च्या शेवटच्या बसथांब्यावर कागदाच्या छोटय़ा कागदाच्या कपटय़ावर लावलेली आहे. या सूचनेचा अर्थ प्रवाशांनी काय समजायचा? ही बस सकाळी आणि संध्याकाळी नेमकी कोणत्या वेळी फेऱ्या करील, याचे सविस्तर वेळापत्रक या थांब्यावर लावले असते तर प्रवाशी त्या भरवशावर थांब्यावर बसची प्रतीक्षा करत थांबले असते. परंतु असे वेळापत्रक न लावल्याने अनेक प्रवाशी या बसथांब्यावर बस येईलच याची खात्री नसल्याने नाइलाजाने रिक्षा वा अन्य पर्याय स्वीकारत आहेत. अशा प्रकारे प्रवाशांची संख्या आपसूकच कमी व्हावी आणि हा बसमार्ग बंद करणे सोयीचे जावे, हाच बेस्टचा यामागे हेतू असावा. अन्यथा बेस्टने ‘फक्त गर्दीच्या वेळी’ म्हणजे नेमक्या कोणत्या वेळी या मार्गावर बससेवा सुरू राहील, हे बसथांब्यावर वेळापत्रक लावून स्पष्ट केले असते. अशा तऱ्हेने एकेक मार्ग प्रवाशी नसल्याचे कारण सांगून बेस्ट बंद करू इच्छिते आहे. मात्र, आपण बससेवा पुरवण्यात कुठे कमी पडतो, अनेक बेस्ट बसेसची अवस्था आज काय आहे, ती तशी का झाली आहे, याचे आत्मपरीक्षण न करता केवळ प्रवाशी कमी होत आहेत हे कारण देऊन अनेक मार्गावरील बससेवा बंद करणे हेच सध्या बेस्टचे उद्दिष्ट असल्याचे दिसते. अशा तऱ्हेने बेस्टची सार्वजनिक बससेवा कमी कमी करत कायमची बंद करून ती एखाद्या खासगी आस्थापनाला विकण्याचा तर बेस्टचा डाव नाही ना, असा दाट संशय मुंबईकर प्रवाशांना येत आहे.