मुंबई : दिवाळीनिमित्त शहरातील मोठ्या बाजारपेठामध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. नेहमीप्रमाणे दादरमधील बाजारपेठेतही प्रचंड गर्दी व परिसरातील रस्त्यांवर नागरिकांची मोठी वर्दळ  आहे. यामुळे दादरमधील कबूतर खाना परिसरातून जाणाऱ्या बेस्ट मार्गावरील बस क्रमांक ११८ वीर कोतवाल उद्यान सर्कल येथे वळण घेऊन मार्गस्त करण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त सर्वत्र चैत्यनाचे वातावरण आहे.

हेही वाचा >>> ‘फुकट फौजदारां’कडून महागड्या वस्तूंचा वापर, मुंबई उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

लक्षवेधी आकाशकंदील आणि रोषणाईने परिसर उजाळून निघाला आहे. शहरातील ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच दिवाळीनिमित्त खरेदीसाठी ठिकठिकाणी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. परिणामी, मुंबईतील विविध भागांतील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. तसेच या गर्दीतून दुचाकी व चारचाकी वाहन चालविणे चालकांना अवघड बनत आहे. वाहतूक पोलीस ठिकठिकाणी तैनात असून ते वाहतुकीचे नियमन करीत आहेत. तसेच ग्राहकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन दादरमध्ये कबूतर खाना परिसरातील बेस्ट मार्गावरील बस क्रमांक ११८ वीर कोतवाल उद्यान सर्कल येथे वळण घेऊन येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.