मुंबई : बेस्ट उपक्रमाची दुर्दशा झाली असून उपक्रमाला सावरण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असताना गेल्या पंधरा दिवसांपासून या संस्थेला कोणीही वाली नाही. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक पद गेल्या तब्बल पंधरा दिवसांपासून रिक्त आहे. माजी महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी एकतर्फी पदभार सोडला असून अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सध्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
कुर्ला येथे बेस्ट बसचा ९ डिसेंबर रोजी रात्री भीषण अपघात झाला होता. या अपघातामुळे एकूण दहा जणांना प्राण गमवावे लागले, तर ४० हून अधिक जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर बेस्टच्या दुर्दशेच्या अनेक कहाण्या उजेडात आल्या. चालक मद्यधस्द अवस्थेत गाड्या चालवत असल्याच्या ध्वनिचित्रफितीही समाजमाध्यमांवर फिरल्या. त्यामुळे बेस्टची प्रतिमा डागाळली. या अपघाताच्या चौकशीसाठी मुख्य व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा बेस्ट प्रशासनाने केली होती. मात्र अपघाताला एक महिना होत आला तरी घटनेच्या चौकशीचा अहवाल सादर झालेला नाही. या अपघातानंतर महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. डिग्गीकर हे घटनास्थळी गेले नाहीत, अशीही टीका झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने २४ डिसेंबर रोजी अनिल डिग्गीकर यांची बदली केली. डिग्गीकर यांची बदली झाल्यानंतर बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी डॉ. हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र कांबळे यांनी या पदाचा कार्यभार स्विकारलाच नाही. त्यानंतर २ जानेवारीला कांबळे यांची पुन्हा बदली करण्यात आली. मात्र बेस्ट उपक्रमाच्या अद्याप महाव्यवस्थापक पदी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून हे पद रिक्त आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाचा गाडा सध्या विनानेतृत्व आहे.
हेही वाचा – टाटा रुग्णालय अनुवांशिक समुपदेशन केंद्र उभारणार, निधीसाठी खासगी कंपनीशी करार
दरम्यान, बेस्ट उपक्रम हा मुंबई महापालिकेचे एक अविभाज्य अंग आहे. त्यामुळे महाव्यवस्थापकपदी नियुक्ती होईपर्यंत या पदाचा अतिरिक्त कार्यभार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे देण्यात आला आहे. तसे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.