मुंबई : अटल सेतूमुळे मुंबई – नवी मुंबई प्रवास केवळ २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. मात्र, यासाठी प्रवासी – वाहनचालकांना २५० रुपये पथकर मोजावा लागत आहे. आता मात्र या सेतूवरून सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या दरात प्रवास करता येणार आहे. अटल सेतूवरून बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
बेस्टने कोकण भवन ते वर्ल्ड ट्रेड सेंटर व्हाया अटल सेतू असा बस मार्ग निश्चित केला असून या मार्गावर एस-१४५ क्रमांकाची बेस्ट बस धावण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २१.८० किमी लांबीचा शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू बांधला असून वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या सेतूवरून आजघडीला सरासरी ३० हजार वाहने धावत आहेत. लवकरच ही संख्या ७० हजारांवर जाईल, असा विश्वास एमएमआरडीएला आहे.
या सेतूमुळे मुंबई – नवी मुंबई अंतर केवळ २० मिनिटात पार करणे शक्य झाल्याने या मार्गावर बेस्ट सेवा सुरू करण्याची मागणी सुरुवातीपासून करण्यात येत आहे. त्यानुसार बेस्टनेही अटल सेतूवरून बेस्ट बस सेवा सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे.
असा ‘बेस्ट’ मार्ग असण्याची शक्यता
बेस्टच्या चलो अॅपवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार एस-१४५ अशा क्रमांकाची बेस्ट बस अटल सेतूवरून धावण्याची शक्यता आहे. कोकण भवन ते वर्ल्ड सेंटर व्हाया अटल सेतू असा हा बेस्ट मार्ग असण्याची शक्यता आहे. साई, संगण, तरघर, उलवे नोड, आई तरुमाता, कामधेून, ऑकलँडस, अटल सेतू, पूर्वमुक्त मार्ग, सीएसएमटी, चर्चगेट आणि कफ परेड अशी बेस्ट बस धावण्याचीही शक्यता आहे.