लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात ‘अटल सेतू’वरून गुरुवारपासून बेस्ट बस धावणार आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि कोकण भवन यांना जोडणारी नवीन वातानुकूलित प्रीमियम बस सेवा, बस मार्ग क्रमांक एस-१४५ सुरू होणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या बेस्ट प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे.

बेस्टची सेवा अटल सेतूवरून सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी होती. ती बेस्ट प्रशासनाने मान्य केली. त्यानुसार गुरुवारपासून ही प्रीमियम बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते शनिवारदरम्यान ही सेवा सुरू असणार आहे. दैनंदिन प्रवाशांना वाहतुकीसाठी नवा पर्याय तयार झाला आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर, यशवंतराव चव्हाण सेंटर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (जीपीओ)सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ही बस जोडली गेली आहे. या मार्गावर सुरुवातीला दोन वातानुकूलित बस चालवण्यात येतील. ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि वातानुकूलित सेवा मिळेल. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी या फेऱ्या असल्याने इतर वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-कल्याण-भिवंडी-उल्हासनगरसाठी संयुक्त परिवहन सेवा

कोठून कुठपर्यंत?

कोकण भवन, सीबीडी बेलापूर येथून सकाळी ७.३०, सकाळी ८ वाजता आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर येथून सायंकाळी ५.३० वाजता तसेच सायंकाळी ६ वाजता बस फेऱ्या धावतील.

असे असेल भाडे

वर्ल्ड ट्रेड सेंटर ते कोकण भवन, सीबीडी बेलापूर प्रवासी भाडे २२५ रुपये असेल. या बसचे किमान भाडे ५० रुपये आणि कमाल भाडे २२५ रुपये असेल. कोकण भवन ते सीएसएमटी (जीपीओ) २०० रुपये भाडे असेल.

ॲपवरून आरक्षणाची सोय

प्रीमियम बस सेवेचे उद्दिष्ट दोन व्यावसायिक केंद्रामधील अंतर १०० मिनिटांत पार केले जाईल. प्रीमियम बस सेवा ॲपवरून आरक्षित करून प्रवास करता येईल.

Story img Loader