मुंबई: कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर खबरदारी म्हणून बेस्ट प्रशासनाने सोमवारी रात्रीपासूनच येथील बेस्ट सेवा पूर्णपणे बंद केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. अखेर बेस्टने शुक्रवारी दुपारपासून पुन्हा एकदा कुर्ला पश्चिम स्थानक परिसरातून बेस्ट सेवा सुरू केली. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक, आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

कुर्ला पश्चिम परिसरात सोमवारी रात्री भरधाव वेगात आलेल्या बेस्ट बसने २० ते २५ वाहनांना धडक दिली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले. जखमींपैकी ३२ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी रात्रीच कुर्ला पश्चिम स्थानकात उभ्या असलेल्या सर्व बसगाड्या कुर्ला आगारात नेण्यात आल्या. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून कुर्ला पश्चिम स्थानकातून एकही बस सोडण्यात आली नाही.

हेही वाचा >>> ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक डिग्गीकर कुठे आहेत?

या परिसरातील तणावाचे वातवरण लक्षात घेऊन मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील बस स्थानकावरील बेस्ट सेवा बंद होती. परिणामी प्रवाशांना दीड किलोमीटर पायपीट करून कुर्ला रेल्वे स्थानकातून कुर्ला आगार गाठावे लागत होते. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. प्रवाशांना करावी लागणारी पायपीट लक्षात घेऊन बेस्टने शुक्रवारी दुपारी २ वाजल्यापासून पुन्हा एकदा कुर्ला पश्चिम स्थानक परिसरातील बस सेवा सुरू केली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best buses finally starts from kurla station after three days mumbai print news zws