मुंबई : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी वाहक, चालकांना योग्य कामाला योग्य मोबदला मिळत नाही. कामगारांना मिळणाऱ्या हक्काच्या सुट्ट्या व इतर सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी आणि ‘समान कामाला, समान वेतनासाठी’ मंगळवारी आझाद मैदानात बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले होते.
मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या भाडेतत्त्वावरील बस गाड्यांवरील कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते. तसेच बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधांपासून, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले जाते. याबाबत मंगळवारी आझाद मैदानात संघर्ष कामगार कर्मचारी युनियनतर्फे ‘समान कामाला, समान वेतनासाठी’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बेस्ट उपक्रमातील डागा ग्रुप, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्यूशन्स, बी.व्ही.जी. इंडिया व इतर खासगी कंपन्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.
अनेक कर्मचारी कर्तव्यावर उपस्थिती लाऊन आंदोलनात सहभागी झाले होते. तर, काहींनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी रजा घेतली होती. परंतु, या आंदोलनामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बेस्टच्या बस वेळेत धावत नसल्याने, प्रवाशांना टॅक्सी, ॲप आधारित टॅक्सीवर अवलंबून राहावे लागले. तर, काहींनी पायपीट करून इच्छितस्थळ गाठावे लागले. बस वेळेत येत नसल्याने काही प्रवाशांनी वातानुकूलित बसचे तिकीट काढूनही विनावातानुकूलित बसमधून प्रवास केला. मंगळवारी आंदोलनाची परिस्थिती असताना देखील बेस्टची दुमजली वातानुकूलित ‘हेरिटेज टूर’ बस धावत होती. त्यामुळे प्रवाशांनी याबाबत वाहकाकडे संताप व्यक्त केला.
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात सार्वजनिक बस सेवा देण्यासाठी कायम सेवेत असलेल्या कामगारांचे आणि खासगी कंपन्याद्वारे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे काम तंतोतंत सारखेच आहे. तसेच हे काम बारा महिने, कायम स्वरुपाचे असल्याने व काम कायम चालणारे असल्याने, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम, समान वेतन मिळालेच पाहिजे. या तत्वानुसार बेस्ट उपक्रमामधील कायम आणि नियमित कामगारांना लागू असलेले वेतनमान व इतर सेवाशर्ती तातडीने लागू करावे, अशी मागणी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनकडून करण्यात आली.
खासगी कंपन्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना समान कामाला, समान वेतन व इतर मागण्यांकरिता आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात कामगार सहभागी झाले होते. आंदोलनानिमित्त मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. चर्चेअंती आयुक्तांनी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनची समान कामाला, समान वेतन व इतर मागण्याच्या अनुषंगाने सर्व खासगी कंपन्यांसोबत बैठक आयोजित करण्यास बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांना सांगण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली.
खासगी कंत्राटदाराच्या सर्व कर्मचाऱ्यांनी समान काम, समान वेतन या मागणीसाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला होता. परिणामी बेस्ट उपक्रमाच्या बस फेऱ्यांच्या प्रवर्तनावर परिणाम झाला. तथापि बेस्ट उपक्रमाच्या कायमस्वरूपी चालकांच्या- वाहकांच्या मदतीने बस सेवा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती बेस्ट उपक्रमाद्वारे देण्यात आली.
खासगी कंत्राटदाराच्या मंगळवारी १,९६९ बस धावण्याचे नियोजन होते. परंतु, या दिवशी १,३९१ धावल्या. तर, तब्बल ५७८ बस उभ्याच होत्या. मातेश्वरीच्या सर्वाधिक कमी बस धावल्या. मातेश्वरीच्या ५९० बस धावण्याचे नियोजित असताना, प्रत्यक्षात ३०८ बस धावल्या. तर, २८२ बस उभ्याच होत्या. तसेच टाटाच्या ३४० बस धावणे अपेक्षित असताना, १८१ बस धावल्या आणि १५९ बस उभ्याच होत्या. यावेळी ऑलेक्ट्राच्या १०० टक्के बस धावल्या.