मुंबई : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत आणि कामानुसार पगार मिळत नसल्याने; तसेच बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्यात येत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे मुंबईतील लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळपासून नोकरदार, विद्यार्थी, छोट्या व्यापाऱ्यांना इच्छितस्थळी पोहचण्यास प्रचंड दमछाक झाली. मुलुंड, वडाळा आणि अन्य काही आगारांमधील बेस्टच्या भाडेतत्वावरील बसगाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने आंदोलनाला गालबोट लागले.
बेस्ट उपक्रमात अनेक कंपनीच्या बस भाडेतत्वावर चालवण्यात येत असून, या बसवर कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. परंतु, गेल्या अनेक कालावधीपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच कर्मचाऱ्यांना सुट्ट्या मिळत नसल्याने, पगार वेळेत आणि योग्य होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
कर्मचाऱ्यांच्या समस्याला वाचा फोडण्यासाठी मंगळवारी दुपारपासून संघर्ष कामगार कर्मचारी युनियनद्वारे आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. परंतु, मुंबईतील बेस्टच्या अनेक आगारात सकाळपासून आंदोलनाला सुरुवात झाली होती. बेस्ट उपक्रमातील खासगी कंत्राटदार मातेश्वरी कंपनीच्या बसवाहक, चालकांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला होता. तसेच यावेळी आगारात आलेल्या काही व्यक्तींनी बसचे नुकसान केले. त्यानंतर मुलुंड आगारातील बसगाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या.
बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सुमारे ३० ते ३२ लाख प्रवासी बेस्ट बसवर अवलंबून आहेत. परंतु, सकाळपासून सुरू झालेल्या काम बंद आंदोलनामुळे मुंबईतील बहुसंख्य आगारांतून बसगाड्या कमी संख्येने बाहेर पडल्या. त्यामुळे दररोज सकाळी बेस्टने कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना बराच वेळ बसची वाट पाहावी लागली.
बस येत नसल्याने बस थांब्याबर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. तर, दुपारी उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या प्रवाशांना उन्हाचे चटके सोसत बसची वाट पाहावी लागली. अर्धा ते पाऊण तासाच्या फरकाने बसची एक फेरी होत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला झाला. अनेक ठिकाणी प्रवासी आणि बेस्टचे वाहक, चालकांमध्ये वाद झाले. वाहकांनी तिकीट दिल्यानंतर बराच वेळ थांब्यावर बस येत नसल्याने प्रवासी संतप्त झाले होते.
मंगळवारी सुमारे तीन बसच्या काचा फोडण्यात आल्या, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. तर, याआधीही अनेक आंदोलने झाली असून, बेस्टच्या एकाही बसच्या काचेला धक्का बसला नाही. बसच्या काचा फोडण्याच्या प्रकाराचे समर्थन केले जाणार नाही, असे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.