नेहमीचा बसवाहक सोबतीला न दिल्याने भडकलेल्या एका बसचालकाने आपल्या दोन सहकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले व स्वत कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. बेस्टच्या मुंबई सेंट्रल आगारात शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. हल्लेखोर बसचालकाचे नाव शंकर माने (३५) असे आहे.
गेल्या पाच वर्षांपासून बेस्टच्या सेवेत असलेला शंकर माने सकाळी सहा वाजता आगारात आला. नियोजित काम नेमून देणाऱ्या दिलीप डोंगरे (५५) व रतन भडंगे (५३) या कर्मचाऱ्यांनी (स्टार्टर) मानेला नेहमीच्या बसवाहकाऐवजी दुसरा बसवाहक दिला. मात्र, शंकरने आपल्या नेहमीच्या सहकाऱ्यासाठी आग्रह धरला. परंतु डोंगरे व भडंगे यांनी त्यास नकार दिला. त्यावरून माने याने या दोघांशीही वाद घातला. नेहमीचा सहकारी न मिळाल्यास नोकरी सोडून देईन असे बडबडत माने निघून गेला. नऊच्या सुमारास तो पुन्हा परतला. यावेळी त्याने त्याच्याबरोबर कीटकनाशक आणले होते. ते पिऊनच तो डोंगरे व भडंगे यांच्या केबिनमध्ये घुसला व बेसावध असलेल्या डोंगरे यांच्या खांद्यावर कोयत्याने वार केला. त्यानंतर मानेने भडंगे यांच्यावर हल्ला केला. परंतु भडंगे यांनी त्याचा वार अडवला. त्यावर मानेने भडंगे यांच्या पायावर वार केले. आगारात उपस्थित असलेल्या अन्य दोघांनी माने याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच तो खाली कोसळला. माने तसेच डोंगरे आणि भडंगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानेची प्रकृती चिंताजनक आहे.
कारण अस्पष्ट
माने याने रागाच्या भरात सहकाऱ्यांवर हल्ला केला असला तरी त्याचा या दोघांशी यापूर्वी कधीच वाद झाला नव्हता. त्यामुळे त्याच्या एकाएकी संतापण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याने ज्या बसवाहकाचा आग्रह केला होता, त्याचीही चौकशी केली जात आहे. मानेचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि तो चांदिवली येथील बेस्ट वसाहतीत रहातो. माने याने भायखळा रेल्वे स्थानकाजवळील एका दुकानातून कीटकनाशक व कोयता विकत घेतला असावा, अशी शक्यता नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार म्हेतर यांनी व्यक्त केली.
या प्रकरणाची विभागीय चौकशी नियमानुसार केली जाईल. या तिघांच्या चौकशीतून ज्या गोष्टी बाहेर येतील, त्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येतील. शंकर माने याचे कृत्य रागाच्या भरात झाले, कामाच्या अतिताणामुळे झाले की अन्य काही कारणामुळे ते नक्कीच तपासले जाईल. कारवाईचा निर्णय चौकशीनंतर घेण्यात येईल. – मनोज वराडे, उपजनसंपर्क अधिकारी, बेस्ट
सहकाऱ्यांवर हल्ला, नंतर आत्महत्येचा प्रयत्न
नेहमीचा बसवाहक सोबतीला न दिल्याने भडकलेल्या एका बसचालकाने आपल्या दोन सहकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले व स्वत कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-09-2014 at 04:50 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best driver assaulted two people and tries to commit suicide