दोन महिन्यांच्या दिरंगाईनंतर शहाणपण; कपातीतील विलंबाचे लाभ जानेवारीत मिळणार

सौरभ कुलश्रेष्ठ, मुंबई</strong>

राज्य वीज नियामक आयोगाने मुंबई शहरात राहणाऱ्या बेस्टच्या वीजग्राहकांना दिलासा देत सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांचे वीजदर कमी केले असले तरी तिजोरीत ठणठणाट असल्याने ही दरकपात लागू करण्यात बेस्टने दिरंगाई केली आहे. दरकपात नोव्हेंबरपासून लागू करण्याचा निर्णय बेस्टने घेतला असून गेल्या दोन महिन्यांतील दरकपातीचा दिलासा जानेवारी २०१९ मध्ये देण्याचे बेस्टने ठरवले आहे.

मुंबई शहर परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टचे वीजदर ६ ते ८ टक्के कमी करण्याचा आदेश राज्य वीज नियामक आयोगाने १२ सप्टेंबर २०१८ रोजी दिला. विद्युत विभाग नफ्यात असल्याने त्याचा लाभ वीज आयोगाने मुंबई शहरात राहणाऱ्या बेस्टच्या सुमारे साडेदहा लाख वीजग्राहकांना दिला. मात्र ही दरकपात लागू करण्यास बेस्टने दिरंगाई केली. आता तर ही दरकपात नोव्हेंबरच्या बिलापासून म्हणजेच एक प्रकारे डिसेंबरपासून मिळेल. सप्टेंबर व ऑक्टोबरचा दरकपातीचा दिलासा जानेवारी महिन्यातील वीजबिलात देण्यात येईल, असे बेस्टने आपल्या वीजग्राहकांना कळवले आहे. त्याबाबतचा लघुसंदेश वीजग्राहकांना पाठवण्यात येत आहे.

बेस्टचा २०१९-२० चा अर्थसंकल्प (विद्युत व परिवहन) सादर करण्यात आला असून विद्युतपुरवठा विभागाला १२४ कोटी १७ लाखांचा नफा तर परिवहन विभागाला ८४४ कोटी ७१ लाख रुपयांचा तोटा दाखवण्यात आला. त्यामुळे बेस्ट उपक्रमाची एकूण अंदाजित तूट ७२० कोटी ५४ लाख रुपये आहे. बेस्टला होणारा तोटा हा प्रामुख्याने परिवहनमुळेच होताना दिसतो. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असल्याने २०१७-१८ मध्ये जवळपास १,०४९ कोटी रुपये तोटा परिवहन विभागाला झाला. २०१८-१९ मध्ये हाच तोटा १,००१ कोटी रुपये होता. तर आता २०१९-२० मध्येही ८४४ कोटी ७१ लाख रुपये तोटा दर्शविण्यात आला आहे. परिवहनमुळे तोटा होत असला तरीही गेल्या वर्षी बेस्टकडून बसची भाडेवाढ करण्यात आली होती. त्यामुळे यंदा कोणतीही भाडेवाढ नसल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी स्पष्ट केले होते.

तोटा होत असताना उत्पन्न वाढीचे स्रोत नसल्याने बेस्टच्या तिजोरीत ठणठणाट आहे. त्यामुळे वीजदरातून सध्या मिळत असलेले पैसे तिजोरीत जमा करून कालांतराने वीजदरात कपातीचा दिलासा देण्याचे धोरण बेस्टने अवलंबल्याचे चित्र आहे. याच रोकड टंचाईमुळे दिवाळीसाठी जाहीर झालेले सानुग्रह अनुदान तातडीने कर्मचाऱ्यांना देणेही बेस्टला शक्य झाले नव्हते.

Story img Loader