आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्टच्या वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. इलेक्ट्रीक युनियनचे ६०० कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाच्या अन्य युनियन संपात उतरल्यामुळे मुंबईकरांचे आणखी हाल होण्याची शक्यता आहे. कदाचित बत्ती गुल होऊ शकते. संप सलग चौथ्या दिवशी सुरुच राहिल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांना घर ते स्टेशन किंवा स्टेशनपासून कार्यालय गाठण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
टॅक्सी आणि रिक्षा चालक परिस्थितीचा फायदा उचलून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सात तास चर्चा होऊनही बेस्ट संपात तोडगा निघाला नाही. इतकेच नव्हे, तर संपात तोडगा निघाला नाही तर शनिवारपासून सफाई कामगार आणि रुग्णालय कर्मचारीही संपात उतरणार असल्याने मुंबईकरांचे आणखी हाल होणार आहेत.
कर्मचाऱ्यांनी मतदानाअंती दिलेला कौल विचारात घेऊन विविध मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीने हा संप पुकारला आहे. या संपावर दिवसभर बैठका सुरू होत्या. मात्र त्या निष्फळ ठरल्या. या बैठकांतील चर्चेची माहिती शुक्रवारी कामगारांना मेळाव्यात देण्यात येईल आणि त्यानंतर पुढील व्यूहरचना निश्चित करण्यात येईल, असे बेस्ट कृती समितीने स्पष्ट केले.