प्रशासनाबरोबरच्या चर्चेनंतर आठवडाभराची मुदत ल्ल ३ नोव्हेंबरच्या समितीच्या बैठकीत बोनसवर शिक्कामोर्तब?
आर्थिक गर्तेत चाललेल्या बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान किंवा बोनस मिळावा, या मागणीसाठी बेस्ट कर्मचारी कृती समितीने सुरू केलेला लढा सोमवारी निर्णायक वळणावर पोहोचला. सोमवारी दुपारी कृती समिती आणि प्रशासन यांच्या बैठकीदरम्यान बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी बेस्टच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण कल्पना कर्मचाऱ्यांना देत संपावर जाण्याऐवजी कठीण परिस्थितीत प्रशासनाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी कृती समितीला सकारात्मक निर्णयाच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन देत समितीकडे ३ नोव्हेंबपर्यंतचा अवधी मागितला आहे. त्याचा विचार करून अखेर सोमवारी सायंकाळी संपाबाबतचा निर्णय ३ नोव्हेंबपर्यंत पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली.
बेस्ट उपक्रमाचा संचित तोटा २३०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच दर महिन्याला कर्जावरील व्याजापोटी बेस्टला २४० कोटी रुपये चुकते करावे लागतात. अशा आर्थिक परिस्थितीत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान अथवा बोनस देणे शक्य नसल्याचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी कृती समितीच्या प्रतिनिधींना सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत स्पष्ट सांगितले. तसेच बेस्टच्या खडतर काळात कर्मचाऱ्यांनी उपक्रमाच्या पाठीशी उभे राहून मुंबईकरांना उत्तम सेवा द्यावी, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले होते.
या बैठकीनंतर बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनीही कृती समितीच्या सदस्यांसह चर्चा केली. बेस्टची परिस्थिती हलाखीची असली, तरी कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कर्मचाऱ्यांची मागणी कशी पूर्ण करता येईल, याचा विचार चालू असून त्यासाठी आठवडाभराचा अवधी द्यावा, असे दुधवडकर यांनी कृती समितीला सूचित केले.
या आश्वासनानंतर संध्याकाळी परळ येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कृती समितीच्या सदस्यांनी संप ३ नोव्हेंबपर्यंत पुढे ढकलण्याची घोषणा केली. समितीचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्यांच्याकडूनही काही सकारात्मक निर्णय लागला नाही, तर पुढील आठवडय़ात संपाची घोषणा करण्यात येईल; असे कृती समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader