लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : बेस्ट उपक्रमाचे हळूहळू खासगीकरण होत आहे. त्याचा थेट फटका कर्मचारी वर्ग आणि प्रवाशांना बसतो आहे. बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीने भाडेतत्त्वावर बेस्टच्या बस चालवण्यात येत आहेत. यामुळे बेस्ट बस सेवेला उतरती कळा लागली आहे. बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसमुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. परिणामी, याबाबत बेस्ट कामगार सेनेच्यावतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. बेस्टचे कर्मचारी आणि प्रवाशांनी हाताला काळ्या फिती बांधून प्रशासनाचा निषेध केला.
बस चालवणे, बसची देखभाल-दुरुस्ती करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि प्रवाशांसाठी सुविधा प्रदान करण्यासाठीचा खर्च भागवण्यासाठी बेस्ट उपक्रमात खासगीकरणाला सुरुवात झाली. बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीने भाडेतत्वावर बस घेऊन त्या चालवण्यात येतात. कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यात आले आहे. परंतु, कर्मचाऱ्यांना कमी पगारात देण्यात येतो. त्यांना अवेळी राबवण्यात येते. तसेच भाडेतत्त्वावरील बसची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने प्रवासी वर्गासह कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ‘बेस्ट वाचवा, मुंबई वाचवा’, बेस्टचे खासगीकरण बंद करा, बेस्टमध्ये स्वमालकीच्या बस खरेदी करा, बेस्टमध्ये कायमस्वरूपी कामगार भरती करा, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
आणखी वाचा-गतिमंद मुलीवरील बलात्कार प्रकरण : ७३ वर्षांच्या दोषसिद्ध आरोपीला जामीन नाहीच
त्यांनी बेस्टला मदत करणे आमची जबाबदारी नाही, असे आयुक्तांनी त्यांना भेटल्यावर सांगितले. कुर्ला येथे कंत्राटी पद्धतीने धावणाऱ्या बसचा अपघात झाला. त्या घटनेत ९ प्रवासी दगावले. यापुढे बेस्टचे खासगीकरण रोखले नाही, तर ९० प्रवासी दगावण्याची भीती आहे. बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या ४ हजार बसचा ताफा वाढवावा. कर्मचाऱयांची भरती करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत. बेस्टच्या २८ आगारात गुरूवारी निषेध आंदोलन झाले. परंतु, यापुढील आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने होणार नाही, अशी प्रतिक्रिया बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिली. बेस्टमध्ये सुरू असलेल्या ढिसाळ कारभाराकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. बेस्टच्या विषयावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. बेस्टचा ताफा वाढवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली.