बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप नाहीच
दिवाळीची भेट म्हणून बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा बेस्ट समितीच्या बैठकीत करण्यात आली असली तरी दिवाळी संपून गेली तरी सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे बेस्टमधील सत्ताधारी शिवसेनेने आणि उपक्रमाच्या प्रशासनाने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप होत आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आल्यानंतर बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनाही महापालिकेप्रमाणे १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ही मागणी बेस्ट समिती सदस्यांनी लावून धरली. जोवर सानुग्रह अनुदानाचा निर्णय होत नाही तोवर समितीचे कामकाज करू देणार नाही, असा इशाराच सदस्यांनी दिल्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. याबाबत निर्णय घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी समितीची बैठक घेण्यात आली. यामध्ये ५५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याची घोषणा बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केली. त्यानंतर बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी आपण बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळवून दिले असे सांगत स्वत:ची पाठ थोपटवून घेतली होती.
कर्मचारी नाराज
दीपावलीपूर्वी हे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली गेली तरी दीपावलीचा सण संपल्यानंतरही या सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. याबाबत बेस्ट कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत विरोधी पक्षनेते आणि बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत कर्मचाऱ्यांची ऐन दिवाळीच्या सणात फसवणूक करणाऱ्या सत्ताधारी पक्षाचा आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. कर्मचाऱ्यांना घोषणा करूनही जर सानुग्रह अनुदान मिळत नसेल तर अत्यंत खेदजनक बाब असल्याचे सांगत याला सर्वस्वी प्रशासन आणि सत्ताधारी पक्षच जबाबदार असल्याचे राजा यांनी म्हटले. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.