‘दिन है सुहाना, आज पेहेली तारीख है..’ हे गाणे ऐकत महिन्याच्या पहिल्या दिवशीच पगार घेण्याचे दिवस ‘बेस्ट’मध्ये कधीच उलटले असले, तरी आतापर्यंत १० तारखेच्या आत हातात पडणाऱ्या पगाराने या महिन्यात दडी मारल्याने बेस्ट कर्मचारी सचिंत झाले आहेत. प्रशासनाच्या डोक्यावर असलेले प्रचंड कर्ज, टाटा पॉवरच्या वीजेची रक्कम आणि पालिकेकडून न मिळणारी मदत यांमुळे मे महिन्याची १२ तारीख उलटून गेली, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांचा खिसा मात्र रिकामाच आहे.
१८ किंवा २० तारखेला पगार दिला जाईल, असे आश्वासन बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिले आहे.
महिन्याच्या पहिल्या तारखेला प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात पगार जमा करण्याची परंपरा बेस्टमध्ये केव्हाच मागे पडली आहे. त्यानंतर कधी ५, कधी ८, तर गेले काही महिने १० तारखेला पगार जमा होत होता. मात्र या महिन्यात १२ तारीख उलटून गेली तरीही पगार जमा न झाल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत.
प्रशासनाच्या डोक्यावर असलेले हजारो कोटींचे कर्ज, या कर्जावरील २७ कोटी रुपयांचे व्याज यामुळे बेस्ट प्रशासन आर्थिकदृष्टय़ा प्रचंड मेटाकुटीला आले आहे.
परिवहन विभाग तोटय़ात जात असल्याने तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपने या भाडेवाढीला विरोध केला. तसेच पालिकेतर्फे १५० कोटी रुपयांच्या मदतीचे गाजरही दाखवण्यात आले होते. मात्र या १५० कोटी रुपयांपैकी बेस्टला अद्याप १.५ कोटी रुपयेही मिळाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
बेस्टच्या ४२ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी महिन्याकाठी तब्बल १६० कोटी रुपये खर्च होतात. बेस्टने उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित असताना, तसे काहीच घडत नाही.
बेस्टने पालिकेकडून घेतलेल्या १६०० कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याजही आता चालू झाले आहे. त्यामुळे बेस्टची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात पगार देण्यास विलंब झाल्याचे कळते.
मात्र १८ किंवा २० तारखेपर्यंत पगार दिले जातील, असे आश्वासन प्रशासनाने संतप्त कर्मचाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे आता १८ किंवा २० तारखेला प्रशासन आर्थिक तरतूद कशी करते, याकडे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा