मुंबई : बेस्ट उपक्रमातील डागा ग्रुप, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्यूशन्स, बी.व्ही.जी. इंडिया व इतर खासगी कंपन्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत कर्मचारी ‘समान कामाला, समान वेतन’ व इतर मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानात संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात सार्वजनिक बस सेवा देण्यासाठी कायम सेवेत असलेल्या कामगारांचे आणि खासगी कंपन्याद्वारे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे काम एक सारखेच आहे. तसेच हे काम बारा महिने, कायम स्वरुपाचे असल्याने व काम कायम चालणारे असल्याने, कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘समान कामाला, समान वेतन’ या तत्तानुसार बेस्ट उपक्रमामधील कायम आणि नियमित कामगारांना लागू असलेले वेतनमान व इतर सेवाशर्ती तातडीने लागू कराव्या व इतर मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येईल, असे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.

Story img Loader