बेस्ट कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे रखडलेले पगार अखेर २० मे रोजी होणार आहेत. गेल्या काही वर्षांत बेस्ट प्रशासनावरचा कोटी कोटी रुपयांनी वाढत जाणारा बोजा व त्यावर द्यावे लागणारे कोटयावधी रुपयांमधील व्याज यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचा प्रश्न उग्र होत आहे. महिन्याचा एका तारखेला होत असलेला पगार पुढे ढकलत १० तारखेला आणला गेला असला तरी आता त्या तारखेलाही पगार होत नसल्याने कर्मचारी कातावले आहेत.
कोटय़वधी कर्जाच्या बोजा निस्तरण्यासाठी वेगवेगळे उपाय अंमलात आणले गेले असले तरी त्यातला एकही पर्याय प्रभावी ठरलेला नाही. त्यातही  महानगरपालिकेने आश्वासन देऊनही १५० कोटी रुपयांपैकी पहिला हप्ताही बेस्टकडे अजून देण्यात आलेला नाही. त्यामुळे व्याज भरताना बेस्ट मेटाकुटीला आली आहे. त्यातच ४२ हजार कर्मचाऱ्यांचा दर महिन्याचा पगार देतानाही नाकीनऊ येत आहे. गेल्या चार वर्षांत बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार अनेकदा तारीख उलटून गेल्यावर झाले आहेत. या महिन्यातही १० तारीख उलटूनही पगार झाले नसल्याने कर्मचारी अस्वस्थ होते. पगारासाठी १६० कोटी रुपयांची तरतूद करणे बेस्टला अवघत जाते होते. सरतेशेवटी आता २० मे रोजी कर्मचाऱ्यांना पगार दिले जातील, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी सांगितले.

Story img Loader