आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. दररोज लाखो मुंबईकर बेस्ट बसने प्रवास करतात. आज सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना स्टेशनपर्यंत किंवा स्टेशनवरुन कार्यालय गाठण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या संपाचा फायदा उचलून खासगी टॅक्सी, रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. एक ते दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी शंभर रुपयापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत आहे.

बेस्ट संपामुळे मेट्रो स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे तसेच शेअर टॅक्सीसाठी सुद्धा लांबच लांब रागा लागल्या आहेत. एकूणच या संपाची सर्वसामान्य मुंबईकरांनी झळ सोसावी लागत आहे.

दरम्यान, संप केल्यास कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर बेस्ट प्रशासन गंभीर नाही त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत सुमारे ३०,५०० बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.

या संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीला बेस्टचे जनरल मॅनेजर सुरेंद्रकुमार बागडे हे उपस्थित राहिले नाहीत. मुंबईतील बेस्टच्या डेपोंमध्ये शुकशुकाट असून सर्व बस रांगेत उभ्या असल्याचे चित्र आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या ४० विशेष बसगाडया मुंबईच्या रस्त्यावर धावत आहेत. शिवसेना थेट या संपामध्ये सहभागी झाली नसली तरी बाहेरुन या संपाला पाठिंबा दिला आहे.

Story img Loader