मुंबई : बेस्ट उपक्रमातर्फे ७७ व्या बेस्ट दिनाचे औचित्य साधून ‘बेस्ट उपक्रमाचा इतिहास व उपक्रमाची प्रगतीशील कार्यप्रणाली’ याबाबतची सखोल माहिती देणारे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आणिक आगारातील संग्रहालयात बेस्ट बसची प्रतिकृती, जुनी तिकीटे, तिकीट वितरण यंत्रे, कर्मचाऱ्यांचे पोशाख, बॅच, दुर्मिळ पंखे, वस्तू मुंबईकरांना पाहता येणार आहेत.
बेस्टच्या आणिक आगारातील बेस्ट संग्रहालयात ७ ऑगस्टपासून प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ९ ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन सुरू होते. मात्र, कार्यालयीन कामाचे दिवस, तसेच शालेय मुलांच्या परीक्षा यामुळे अनेक मुंबईकरांना प्रदर्शन पाहता आले नाही.
मुंबईकरांना हे प्रदर्शन पाहता यावा, बेस्टचा इतिहास जाणून घेता यावा, दुर्मिळ वस्तूचे दर्शन घडावे यासाठी बेस्ट उपक्रमाने प्रदर्शनाला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता हे प्रदर्शन ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.