बेस्ट समितीमध्ये वर्चस्व असलेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या आग्रहास्तव ‘बेस्ट’ उपक्रमाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसैनिकांसाठी खास जादा फेऱ्यांचे आयोजन केले होते. मात्र शिवसैनिकांनी ‘बेस्ट’साठी थांबण्याचे पसंत न करता खासगी वाहनांचा आसरा घेतल्याने या फेऱ्या मध्येच रद्द करण्याची वेळ ‘बेस्ट’वर ओढावली. परिणामी सायंकाळी ‘बेस्ट’ची एकही जादा फेरी धावली नाही.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तमाम शिवसैनिक शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्कवर येणार, हे निश्चित होते. दादर स्थानकात उतरणाऱ्या किंवा मुंबईच्या विविध उपनगरांतून शिवाजी पार्कवर येणाऱ्या शिवसैनिकांसाठी ‘बेस्ट’ने खास जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. बेस्ट समितीचे अध्यक्ष संजय उर्फ नाना आंबोले यांच्या लेटरहेडवरील तसे पत्रकही ‘बेस्ट’ने पाठवले होते. या पत्रकानुसार दादर पूर्व स्वामीनारायण मंदिर ते शिवाजी पार्क, कुलाबा, बॅक बे, अंधेरी, विक्रोळी, मुलुंड, नवी मुंबई आदी उपनगरांतून शिवाजी पार्ककडे जादा बसफेऱ्या चालवण्यात येणार होत्या. या मार्गावर प्रत्येकी दोन ते चार जादा फेऱ्या चालवल्या जातील, असेही ‘बेस्ट’तर्फे स्पष्ट करण्यात आले.
मात्र प्रत्यक्षात रविवारी ‘बेस्ट’च्या या जादा फेऱ्यांना अत्यल्प प्रतिसाद लाभला. शिवसैनिकांनी रेल्वे किंवा खासगी वाहने यांचा आधार घेत ‘बेस्ट’कडे पाठ फिरवली. त्यामुळे रविवारी सकाळपासून सुरू करण्यात आलेल्या या जादा फेऱ्या दुपारी बंद करण्यात आल्या. संध्याकाळी एकही जादा फेरी ‘बेस्ट’ने सोडली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best extra trips formula collapse