बेस्ट उपक्रमातील निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या १,३५६ वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. या बाबतचा ऐतिहासिक निर्णय बेस्ट समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी मंगळवारी बैठकीत घेतला.बेस्ट उपक्रमाच्या सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाले, तर त्याच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्याची प्रथा आहे. मात्र गेल्या १० वर्षांत अनुकंपा तत्त्वावरील एकाही कर्मचाऱ्याला सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या वारसांची संख्या तब्बल १,३५६ वर पोहोचली आहे. कर्मचाऱ्यांच्या वारसांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना बेस्टच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय अशोक पाटील आणि बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी घेतला.
अनुकंपा तत्त्वावर अर्ज करण्यात आलेल्या वारसांची तीन श्रेणींमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. कामावर असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्राधान्याने प्रथम सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. तसेच सेवेत असताना अपघाती निधन झालेल्या, तसेच आजारपणात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही नोकरी देण्यात येणार आहे, असे अशोक पाटील म्हणाले.
अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी अर्ज करणाऱ्या १,३५६ वारसांना एकाच वेळी सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. त्यासाठी काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.
आतापर्यंत या अर्जदारांपैकी सुमारे ६५० जणांना नोकरीसाठी पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती देऊन अशोक पाटील म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या जयंती दिनाचे औचित्य साधून २३ जानेवारी रोजी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनुकंपा तत्त्वावरील पाच जणांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा