पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रवाशांना ‘बेस्ट’ प्रवास घडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी प्रवासी मात्र ’बेस्ट’च्या प्रवासाला ‘नॉट बेस्ट’ ठरवत आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१५ या एका महिन्याच्या कालावधीत सुमारे दीड लाख प्रवासी घटल्याचे उघडकीस आले आहे. मात्र सुट्टय़ांचा काळ असल्याने ही आकडेवारी घटल्याचे ‘बेस्ट’चे काही अधिकारी सांगत आहेत.
गेल्या काही वर्षांपूर्वी ‘बेस्ट’ बसगाडय़ांनी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ४०-४५ लाखांवर होती. कालातंराने प्रवाशांची संख्या कमी होत गेली. जून २०१५ मध्ये प्रवाशांची संख्या २८.६ लाखांवर आली. जुलमध्ये ३०.५ लाख, ऑगस्टमध्ये ३०.७ लाख, सप्टेंबर महिन्यात २९.९ लाख अशी झाली. मात्र त्यानंतर एका महिन्यात हाच आकडा सुमारे दीड लाखांनी घटल्याचे समोर आले आहे. यामुळे आधीच तोटय़ात धावणाऱ्या बेस्टची आíथक स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय वातानुकूलित बसगाडय़ांच्या प्रवासी संख्येतही झपाटय़ाने घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात रोज प्रवास करणाऱ्या ७६ हजार प्रवाशांची संख्या सुमारे ८ हजारांवर पोहोचली असल्याचे सांगण्यात आले. २०१५ या वर्षांत ‘बेस्ट’ची दोनदा झालेली भाडेवाढ, बसगाडय़ांची वाईट अवस्था आणि शेअर रिक्षा-टॅक्सीचालकांकडून ‘बेस्ट’च्या तुलनेत कमी ठेवण्यात आलेले भाडे यामुळे ‘बेस्ट’च्या प्रवासी संख्येत घट होत असल्याचे जाणकार सांगत आहेत, तर अनेक प्रवासी सुट्टीनिमित्त या महिन्यात मुंबईबाहेर जात असल्याने प्रवासी संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे अधिकारी सांगत आहेत.