बेस्ट उपक्रमाने वीज वितरण व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी मुंबईत स्मार्ट वीज मीटर बसविण्याचा निर्णय घेतला असून येत्या तीन महिन्यांत ग्राहकांच्या घरी स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीज वापराची अचूक माहिती मिळू शकेल, असा दावा बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. सध्या या स्मार्ट मीटरची चाचणी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, बेस्टच्या १० लाखांहून अधिक ग्राहकांचे जुने मीटर बदलावे लागणार आहेत.
हेही वाचा >>>मुंबई : कुष्ठरोग रुग्णालयातील चर्चने कात टाकली;महानगरपालिकेने केला जीर्णोद्धार
बेस्ट उपक्रमाने विद्युतपुरवठा विभाग अत्याधुनिक करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्युत विभागात वितरण प्रणाली सुधारणा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रणालीअंतर्गत जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. या मीटरचे कार्य स्वयंचालित पद्धतीने चालणार आहे. यामध्ये स्मार्ट मीटर थेट विद्युत विभागाच्या नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहेत. स्मार्ट मीटरचा सर्वाधिक फायदा वीज चोरी, वीज गळती रोखण्यासाठी होणार असून वीज ग्राहकांनाही वीज वापराची अचूक माहिती मिळणार आहे.
हेही वाचा >>>मुंबई: चंदा आणि दीपक कोचर यांचे अटक व सीबीआय कोठडीला आव्हान; उच्च न्यायालयाचा मात्र तातडीच्या सुनावणीसाठी नकार
स्मार्ट मीटरमुळे विद्युतपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड तात्काळ विद्युत विभागाच्या नियंत्रण कक्षाला समजण्यास मदत होणार आहे. तसेच एखाद्याच्या घरातील वीजपुरवठा खंडित झाल्यास त्यामागील कारण आणि मूळ ठिकाण याचीही माहिती नियंत्रण कक्षाला मिळू शकणार आहे. त्यामुळे त्वरित बिघाड दुरुस्त करता येणार आहे. विविध कारणांमुळे ६० टक्के विजेची तूट होत असून बेस्टला मोठा आर्थिक फटका बसत आहे. स्मार्ट मीटरमुळे ही तूट काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. या योजनेसाठी साडेतीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यासाठी केंद्र सरकारकडून अनुदानही मिळणार आहे.
हेही वाचा >>>मुंबई: समृद्धी महामार्गावरील सुविधांना विलंब होण्याची चिन्हे; फूड प्लाझा, अन्य सुविधांच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ
वीज ग्राहकांना अचूक माहिती
स्मार्ट मीटरमुळे बेस्टच्या वीज ग्राहकांना वीज वापराबाबतची अचूक माहिती ऑनलाईन मिळणार आहे. यासाठी मोबाइल ॲपही उपलब्ध करण्यात येणार आहे. एखाद्या महिन्यात विजेचा वापर किती झाला याची माहिती ग्राहकाला मिळू शकणार आहे. तसेच स्मार्ट मीटरमध्ये प्रिपेड मीटर सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे. महिन्याभरात किती विजेचा वापर होतो याचा अंदाज घेऊन त्यानुसार मीटरचे रिचार्ज करता येऊ शकेल. रिचार्जसाठी महिन्याभराचे पैसे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. रिचार्ज केलेल्या रक्कमे इतकीच वीज ग्राहकाला वापरता येणार आहे.
पुढील तीन महिन्यांत बेस्टच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. त्यामुळे वीज वापर आणि बिलाची अचूक माहिती ग्राहकांना योग्य वेळेत मिळेल. यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल. -लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम