मुंबई : मुंबईतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांची मदत घेतली असून आतापर्यंत एकूण १७० बसगाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित बसगाड्यांवरही लवकरच यंत्रे बसविण्यात येणार असून मुंबईतील कुर्ला, मरोळ व आणिक या स्थानकांमध्ये बसगाड्यांवर यंत्रे बसविण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुंबईकरांना शुद्ध हवा मिळावी, तसेच हवेचा दर्जा सुधारावा यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे विविध उपक्रम व उपाययोजना सुरु आहेत.
हेही वाचा >>> दोन दिवसांत १२ हजार फलक काढले;आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश
गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबईतील हवेचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला होता. वातावरणीय बदल, मुंबईतील विकासकामे आणि त्यामुळे उडणारी धूळ, वाहने आणि कचरा जाळण्यामुळे निर्माण होणार धूर आदींमुळे मुंबईकरांना श्वास घेणे कठीण झाले होते. संबंधित समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. बांधकाम क्षेत्रातील व्यवसायिकांनाही विविध बंधने घालण्यात आली. त्याचबरोबर पालिकेने बेस्ट उपक्रमाचीही मदत घेऊन बसगाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >>> वृद्धत्व, प्राणी-पक्ष्यांमधील झटापटी, अवयव निकामी झाल्यामुळे प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे मृत्यू
या कामासाठी लागणारा संपूर्ण खर्च पालिकेकडून केला जात असून सद्यस्थितीत मुंबईच्या रस्त्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रे कार्यान्वित झालेल्या एकूण १७० बसगाड्या धावत आहेत. एकूण २०० बसगाड्यांवर ही यंत्रे बसविण्यात येणार असून प्रायोगिक तत्वावर ही अंमलबजावणी करण्यात येत आहे. हवा शुद्धीकरणासाठी पालिकेतर्फे पाण्याने रस्ते धुण्याचेही काम सुरु आहे. प्रशासनाच्या विविध उपाययोजना व वातावरणातील सकारात्मक बदल यांमुळे मुंबईतील हवेचा काही प्रमाणात दर्जा सुधारल्याचे दिसून येत आहे.