मुंबई: बेस्ट उपक्रमातील भाडेतत्वावरील बसगाड्यांची सेवा तत्काळ बंद करावी, बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाढवावा अशी मागणी बेस्ट कामगार सेनेने केली असून बेस्ट उपक्रमातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी कामगार सेनेने आपले २० मागण्यांचे निवेदन दिले आहे.
बेस्ट उपक्रमाची गेल्या काही दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. बेस्ट उपक्रमामधील भाडे तत्वावरील गाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून बेस्टची प्रतिमाही मलीन होत चालली आहे. तसेच बेस्टची सेवाही रसातळाला गेली आहे. त्यातच बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी अद्याप कोणीही आयएएस अधिकारी येण्यास तयार नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला सध्या कोणीही वाली नाही. अशा परिस्थितीत बेस्टच्या विविध अडचणींसदर्भात चर्चा करण्यासाठी कामगार सेनेने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे वेळ मागितली होती. सध्या बेस्ट उपक्रमाचा कार्यभार हा पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी अश्विनी जोशी यांनी बेस्ट कामगार संघटनेला चर्चेसाठी वेळ दिली होती. त्यानुसार बुधवारी ही बैठक झाली.
हेही वाचा >>>गोराई आगारातील बसने तरुणाला चिरडले,भाडेतत्वावरील बस अपघातांच्या घटनांचे सत्र सुरुच
या बैठकीसाठी बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर जुन्नरे, भास्कर तोरसकर, गणेश शिंदे उपस्थित होते. तसेच बेस्ट उपक्रमातील अधिकारी पाटसुते, मढवि,जगताप, शिरसाट उपस्थित होते. कुर्ला येथे झालेल्या अपघाताविषयी मौर्या कंपनीने उपकंत्राटदार नेमला होता त्याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच बेस्ट उपक्रमात स्वमालकीच्या बस लवकरात लवकर खरेदी कराव्यात. बेस्ट उपक्रमात विद्युत पुरवठा विभागातील सर्व कामगार पदावरील पदे भरती करण्यासाठी आदेश देण्यात यावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.