मुंबई: पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. त्यानुसार विदयार्थ्यांसाठी १०० फेऱ्यांचा ९९९ रुपयांचा मासिक पास ५०० रुपये सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी बेस्टच्या दुमजली बसच्या लोकार्पण सोहळ्यात पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही सवलतीच्या दरात पास उपलब्ध करण्याचे आदेश बेस्ट प्रशासनाला दिले होते.
उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, मासिक बस पासबरोबरच तिमाही बसपास १५०० रुपये आणि अर्धवार्षिक बसपास २५०० रुपये इतक्या किमतीला उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत बारावी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६४९ रुपये किमतीचा १०० बस फेऱ्यांचा बसपास ३५० रुपये सवलतीच्या दरात मिळणार आहे. तर १०५० रुपयांचा तिमाही बसपास आणि अर्धवार्षिक मुदतीचा १७५० रुपयांत मिळेल. या सवलतीची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून (२२ ऑगस्ट) होणार आहे. बेस्टच्या चलो अँपच्या माध्यमातूनही विद्यार्थी अर्ज करू शकतात किंवा जवळच्या आगारात जाऊन स्मार्ट कार्ड घेऊ शकतात. सध्या दहावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठीच फक्त सवलतीत बसपास उपलब्ध आहेत.