गेल्या काही दिवसांपासून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रस्तावित सवलतींचा सपाटा लावलेल्या बेस्ट प्रशासनाने मोठय़ा दुकानातील कर्मचाऱ्यांना दिलासा देत आणखी एक नवा फंडा शोधला आहे. शहरातील मोठय़ा दुकानांतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष पास देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या पासमुळे दुकानातील एखादा कर्मचारी सुटीवर असल्यास त्या कर्मचाऱ्याच्या पासवर दुसऱ्या कर्मचाऱ्याला प्रवास करता येणार आहे. यासाठी एक ओळखपत्रही दिले जाणार असल्याचे समजते.
सध्या मुंबई व उपनगरात अनेक नामांकित दुकानांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहेत. अशा एका दुकानात एका वेळी ३० ते ४० कर्मचारी काम करत असतात. यात काही ठिकाणी काही कर्मचाऱ्यांना दुकानाच्या कामासंबंधी नियमित प्रवास करावा लागतो. अशा मार्गावर कर्मचाऱ्यांना मालकाकडून पास काढून दिला जातो. मात्र अनेक वेळा ज्या कर्मचाऱ्याचा पास काढला आहे. तो कर्मचारी रजेवर असतो. अशा वेळी इतर कर्मचाऱ्याला नव्याने तिकीट काढावे लागते. याच धर्तीवर बेस्टने विशेष पास काढून देण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय प्रवासी संख्या वाढवण्यासाठी अनेक मोठय़ा कंपन्यांकडे संपर्क साधून ‘कॉर्पोरेट बस पास’ सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात कंपन्यांच्या मागणीनुसार एकत्रित बस पास देण्यात येतील. यात सर्व प्रकारच्या बससेवांचा समावेश असून ठरावीक अंतराचे तसेच मॅजिक बस पास कंपन्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र यासाठी अटी व नियम बेस्ट प्रशासनाकडून ठरवून दिल्या जातील, असे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा