बेस्टच्या बस पास, आरएफआयडी कार्ड, स्मार्ट कार्ड योजनेला प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद मिळत असला तरी बसपास विक्री केंद्रे अपुरी पडू लागली आहेत. त्यामुळे विक्री केंद्रांतील खिडक्या प्रवाशांसाठी १२ तास खुल्या ठेवण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.
बस पास, आरएफआयडी कार्ड आणि स्मार्ट कार्ड देण्यासाठी बेस्टने बस स्थानके आणि आगारांमध्ये सुमारे ६५ विक्री केंद्रांमध्ये ९० खिडक्या सुरू केल्या आहेत. या केंद्रांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. आणखी खिडक्या सुरू करणे तूर्तास तरी बेस्टला शक्य नाही. त्यामुळे या खिडक्या १२ तास खुल्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत बस पास, एरएफआयडी कार्ड आणि स्मार्ट कार्ड काढता येईल. तसेच रविवारी २१ विक्री केंद्रे सकाळी ७ ते सायंकाळी ७, तर २२ विक्री केंद्रे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत प्रवाशांसाठी खुली राहतील. प्रवाशांकडून सुट्टीच्या दिवशी फारसा प्रतिसाद न मिळणारी २२ केंद्रे रविवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. देवनार बस आगार व कांजूरमार्ग स्थानक (पश्चिम) येथील विक्री केंद्र रविवारी सकाळी ९ ते दुपारी ४ सुरू असेल, तर धारावी  बस आगार व सांताक्रूझ बस आगारातील केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.