मुंबई : बेस्ट उपक्रमाची विजेवर धावणारी आरामदायी वातानुकूलित प्रीमियम बस येत्या १२ डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. पहिली बस ठाणे – वांद्रे कुर्ला संकुल मार्गावर दर अर्ध्यातासाने धावणार आहे. या मार्गावरील प्रीमियम बसचे भाडे २०५ रुपये निश्चित करण्यात आले आहे.
कार्यालयीन वेळेत बेस्ट बसगाड्यांना होणारी गर्दी, वेळेत उपलब्ध न होणारी बस आदी समस्या लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने मोबाइल ॲपवरून आसन आरक्षित करण्याची सुविधा असलेली विजेवर धावणारी वातानुकूलित प्रीमियम बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना ‘चलो मोबाइल ॲप’वरून या बसमधील आसन आरक्षित करता येणार आहे. ठाणे – वांद्रे कुर्ला संकुल प्रीमियम बस सकाळी ७ ते सकाळी ८.३० या वेळेत दर अर्ध्यातासाने, तर वांद्रे कुर्ला संकुल – ठाणे बस सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७ या वेळेत दर अर्ध्यातासाने प्रवाशांना उपलब्ध होईल. तसेच सकाळी ८.५० ते सायंकाळी ५.५० दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल – वांद्रे स्थानक, तसेच सकाळी ९.२५ आणि सायंकाळी ६.२५ वाजता वांद्रे स्थानक – वांद्रे कुर्ला संकुल मार्गावर प्रीमियम बस प्रवाशांना उपलब्ध होईल. या मार्गावर एकेरी प्रवासासाठी प्रतिप्रवासी ५० रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>मुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक
‘चलो मोबाइल ॲप’वरून प्रवाशांना बसमधील आसन आरक्षित करता येईल. या बसमधून उभ्याने प्रवास करण्यास परवानगी नाही. ‘चलो ॲप’वर या बसचा मार्ग, अपेक्षित वेळ, त्या मार्गावर आणखी किती बस सेवा असतील, याची माहिती समजणार आहे.
सवलतीत प्रवास घडणार
बेस्ट उपक्रमाने प्रीमियम बस प्रवासासाठी सवलतही जाहीर केली आहे. वांद्रे कुर्ला संकुल – ठाणे मार्गावर पहिल्या पाच फेऱ्यांसाठी १०० रुपये आणि वांद्रे कुर्ला संकुल-वांद्रे स्थानक दरम्यान पहिल्या पाच फेऱ्यांच्या प्रवासासाठी तिकिटात १० रुपये सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत सात दिवसांसाठीच लागू असणार आहे.
चार प्रीमियम बस सेवेत
१२ डिसेंबरपासून चार प्रीमियम बस सेवेत येतील. या महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी २० ते २२ प्रीमियम वातानुकूलित बस दाखल होणार आहेत. खारघर – बीकेसी मार्गांवरही ही बस चालवण्याचे नियोजन आहे.
हेही वाचा >>>मुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
प्रीमियम बसमधून महिनाभर सवलतीत प्रवास
ठाणे-वांद्रे कुर्ला संकुल मार्ग
३० दिवसात १० फेऱ्यांचा पास २,०५० रुपयांऐवजी १,४४० रुपयात
३० दिवसात ३० फेऱ्यांसाठी ६,१५० रुपयांचा पास ३,८४० रुपयात
४५ दिवसात ४५ फेऱ्या ९,२२५ रुपयांचा पास ५,४४५ रुपयात
९० दिवसात ९० फेऱ्यांसाठी १८,४५० रुपयांचा पास ९,२७० रुपयात
वांद्रे स्थानक-वांद्रे कुर्ला संकुल सवलत प्रवास पास
३० दिवसात १० फेऱ्यांचा पास ५०० रुपयांऐवजी ३५० रुपयात, तर ३० दिवसात ३० फेऱ्यांसाठी १,५०० रुपयांऐवजी ९३० रुपये आणि ४५ दिवसात ४५ फेऱ्यांसाठी २,२५० रुपयांएवजी १,३५० रुपये पास असेल.