भावांच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी गर्दीचा सामना करत मुंबईतील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या तमाम बहिणींना दिलासा देण्यासाठी रेल्वे आणि बेस्ट हे दोन्ही उपक्रम पुढे सरसावले आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी तिकिटाच्या रांगेत ताटकळत उभे राहायला लागू नये, यासाठी रेल्वे २० स्थानकांवर चक्क तिकीट तपासनीसांच्या हाती सीव्हीएम कूपन देणार आहे. असे ८० पेक्षा जास्त तपासनीस सीव्हीएम कूपन्सची विक्री करताना दिसतील. तर दुसऱ्या बाजूला बेस्ट ९१ मार्गावर २११ जादा गाडय़ा चालवणार आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बाहेर पडणाऱ्या गर्दीचा विचार करून रेल्वे आणि बेस्ट यांनी प्रवाशांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. सणासुदीच्या दिवशी रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर दीड दीड तास तिकिटांसाठी लोक उभे असल्याचे चित्र हमखास दिसते. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी हे चित्र बदलण्यासाठी ठाणे, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, नाहूर, मुलुंड, कोपर, दिवा, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, बदलापूर, चेंबूर आणि वडाळा या स्थानकांमध्ये रेल्वेने चक्क तिकीट तपासनीसांच्या हाती सीव्हीएस कूपन्स देण्याचे ठरवले आहे. यासाठी एखादी खिडकी किंवा मोकळी जागा या तपासनीसांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. हे तिकीट तपासनीस तिकिटाच्या रकमेएवढी सीव्हीएम कूपन्स विकतील. रेल्वेने असे ८० पेक्षा जास्त तिकीट तपासनीस तयार केले आहेत. त्याशिवाय जास्त गर्दीच्या स्थानकांमध्ये गरज भासल्यास जादा तिकीट खिडक्या उघडल्या जातील, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी सांगितले.
दुसऱ्या बाजूला रेल्वे स्थानकातून बाहेर पडून इच्छित स्थळी जाण्याची सोय बेस्टने केली आहे. बेस्टने आपल्या ९१ मार्गावर २११ जादा बसेस सोडण्याचे ठरवले आहे. या जादा बस सकाळी १०.३० पासून दिवसभर चालवल्या जातील. बेस्ट उपक्रमाच्या सर्व बस आगारांतून या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.